जगातील प्रतिष्ठीत अशी ‘कॉमनवेल्थ’ शिष्यवृत्ती मिळविण्यात डोंबिवलीतील विवेक पाचपांडे या तरूणाला यश आले आहे. या शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या देशभरातील २५ जणांमध्ये विवेकचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे विवेक अंध असून या शिष्यवृत्तीवर नाव कोरणारा तो भारतातील पहिला अंध विद्यार्थी ठरला आहे.
दोन वर्षांपूर्वीही विवेकने या शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते. तेव्हा त्याला यश आले नाही. परंतु, या अपयशाने न खचता त्याने पुन्हा एकदा तयारीनिशी शिष्यवृत्तीकरिता अर्ज केला. या वेळेस त्याचा संशोधन विषय शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरविण्यात आला आहे. तीन वर्षांच्या संशोधन कार्यासाठी विवेकला ही शिष्यवृत्ती मिळाली आहे. तत्त्वज्ञान हा विवेकच्या अभ्यासाचा विषय असून ज्ञानशास्त्र या विषयावर तो संसोधन करू इच्छितो.
ब्रिटीश सरकारतर्फे कॉमनवेल्थ देशांमधील विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीकरिता निवड केली जाते. या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना इंग्लंडमधील विद्यापीठांमध्ये आपले संशोधन कार्य पूर्ण करण्याची संधी मिळते. संशोधनासाठीच्या फेलोशीप, पदव्युत्तर, पीएडी अशा स्तरांवर ही शिष्यवृत्ती दिली जाते. त्यापैकी विवेकची पीएचडी कार्यक्रमाकरिता निवड करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विवेकला जागतिक क्रमवारीत १७ व्या क्रमांकावर असलेल्या स्कॉटलंड येथील एडिनवर्ग विद्यापीठात तीन वर्षे संशोधन करता येणार आहे. तेथील ग्रंथसंपदा, प्राध्यापकांचे मार्गदर्शन, कार्यशाळा आदींच्या माध्यमातून त्याला हे संशोधन कार्य पूर्ण करायचे आहे.
ही शिष्यवृत्ती जगातील प्रतिष्ठेच्या शिष्यवृत्तींमध्ये गणली जाते. त्यामुळे ही शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी जगभरातून विद्यार्थी प्रयत्नशील असतात. अनेक विषयांकरिता ही शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र मानव्य आणि त्यातही तत्त्वज्ञान या विषयाकरिता ही शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच स्पर्धा असते. ‘यासाठी कोणतेही आरक्षण किंवा तरतूद नसते. केवळ विद्यार्थ्यांची त्यांच्या गुणवत्तेवर या शिष्यवृत्तीकरिता निवड केली जाते. त्यांना योग्य उमेदवार न मिळाल्यास ते शिष्यृवत्ती देत नाही. त्यामुळे, आपल्याला या शिष्यवृत्तीचे मोल मोठे आहे,’ अशी प्रतिक्रिया विवेक याने व्यक्त केली. शिष्यवृत्तीच्या रकमेत शैक्षणिक शुल्काबरोबरच प्रवासखर्च, संशोधन आणि इतक खर्चासाठीचा भत्ता आदीचा समावेश असणार आहे. या शिवाय महिन्याला ठराविक रक्कम स्टायपेंड म्हणूनही दिली जाणार आहे. १४ सप्टेंबरपासून विवेकचे सत्र सुरू होणार असून १० सप्टेंबरला तो इंग्लंडला रवाना होणार आहे.

दृष्टीहीन असल्याने विवेक तत्त्वज्ञानावरची जाडजुड पुस्तके कशी वाचत असेल असा प्रश्न पडतो. त्यासाठी त्याला उपयोग होतो तो स्क्रीन रीडर या सॉफ्टवेअरचा. याच्या सहाय्याने संगणकावरील मजकूर ऐकता येतो. तर पुस्तकांची पाने ओसीआरच्या मदतीने स्कॅन करून ती वाचता येतात. अर्थात जे पुस्तक वाचण्याकरिता सामान्य व्यक्तीला १० तास लागत असतील तर विवेकला त्या करिता तिप्पट वेळ लागतो. या पाश्र्वभूमीवर विवेकने मिळविलेले यश अधिकच कौतुकाला पात्र ठरते. त्याला ज्या एडिनबर्ग विद्यापीठात प्रवेश मिळाला आहे त्या विद्यापीठाचे ग्रंथालय हे इंग्लंडमधील चौथे सुसज्ज गं्रथालय म्हणून प्रसिध्द आहे. त्यांचे डिजिटल ग्रंथालयही सुसज्ज असे आहे. त्यामुळे, आपल्याला त्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे, असे विवेक सांगतो.