सर्वासाठी आरोग्य सेवेचा विचार करतांना शास्त्रीय बंधने पाळायच्या अटीवर काही खासगी डॉक्टर्सचा सार्वजनिक सेवांना पूरक म्हणून समावेश, आयुष पध्दतीचा समावेशासह पुरेसे सक्षम मनुष्यबळ विकसित करणे आवश्यक आहे. तसेच हे करतांना रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात सुसंवाद रहावा यासाठी ‘बॅचरल इन कम्युनिटी हेल्थ’ हे प्रशिक्षण उपयुक्त ठरू शकेल अशी अपेक्षा ‘साथी’ संस्थेने व्यक्त केली आहे. तसेच औषधांची खरेदी, त्यांचा आरोग्य केंद्रांना पुरवठा आणि वापर याबाबतही अन्य काही पर्याय शोधल्यास परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होईल असे अहवालात म्हटले आहे.

सर्वसमावेशक आरोग्य सेवा उभी करतांना सार्वजनिक सेवांचे सक्षमीकरण व वाढ केल्यावरही जिथे त्या अपुऱ्या पडतील तिथे काही खासगी सेवेच्या मदतीने कमतरता भरून काढता येईल. अशा खासगी सेवांचा समावेश सार्वजनिक सेवांना हटवणारा नसून त्यांना बळकटी देण्याच्या दृष्टीने असेल. सरकारी मदत घेतलेल्या धर्मादाय रुग्णालयातील २० टक्के खाटा गरीब व कमकुवत गटासाठी मोफत, सवलतीच्या दरात सेवा देण्यासाठी वापरल्या पाहिजे असे बंधन हवे. तसेच या व्यवस्थेत ‘आयुष’ पध्दतीचा समावेश गरजेचा आहे. सुरूवातीला बहुलता या तत्वाने स्थानिक मागणी, गरज यानुसार अ‍ॅलोपॅथी सोबत आयुष पैकी काही उपचार प्राथमिक ते तृतीय पातळीवर उपलब्ध करून दिले जातील. लोक त्यातून निवड करू शकतील. त्या त्या आरोग्य प्रणालीचे तज्ज्ञ आपल्या सिध्दांतानुसार उपचार करतील. यामुळे आयुष डॉक्टरांना मूळ पाया, सम्रग डॉक्टर म्हणून काम करण्यासाठी एक वर्षांचे अ‍ॅलोपॅथीचे, प्राथमिक आरोग्यसेवेसाठीच्या शास्त्रीय उपचार प्रणालीचे प्रशिक्षण घेऊन ते समग्र पध्दतीने प्राथमिक आरोग्यसेवा देऊ शकतील, असे साथीने म्हटले आहे.
दुसरीकडे सक्षम मनुष्यबळात वाढ करावी लागणार आहे. निरनिराळे पॅरोमेडिक्स-नर्सेस, सार्वजनिक आरोग्य सेवक आदी मोठय़ा प्रमाणावर मिळण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेशी जोडलेली प्रशिक्षण केंद्र सरकारने पुरेशा प्रमाणात सुरू करणे, ‘बॅचलर इन कम्युनिटी हेल्थ’ हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम सुरू करणे. जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयाशी जोडलेल्या प्रशिक्षण केंद्रात तो चालवून मोठय़ा प्रमाणावर प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणे, भरती-बदली, पदोन्नती याबाबत पारदर्शकता आणणे. त्यातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी ‘कर्नाटक पॅटर्न’चा स्वीकार करावा, असेही सुचविण्यात आले आहे. डॉक्टरांची मानसिकता तशी व्हावी यासाठी त्यांना योग्य मानधन देणे गरजेचे आहे. दरम्यान, आरोग्य व्यवस्थेला पूरक अशा औषधांची खरेदी, त्यांचा आरोग्य केंद्राना पुरवठा आणि वापर या व्यवस्थेत बदल होणे गरजेचे आहे. याबाबत सर्व माहिती अद्ययावत करत संगणक व इंटरनेट मार्फत त्याचे योग्य नियोजन, ठराविक यादी व बजेट यांच्या मर्यादेत पण आरोग्य केंद्राच्या गरजेप्रमाणे त्यांना पुरवठा करण्यासाठी पासबुक पध्दतीचा वापर करावा तसेच जेनेरिक औषधांना व औषधांच्या शास्त्रीय वापराला प्रोत्साहन द्यावे, असे साथीने सुचविले आहे.