जंगलालगतच्या गावांमध्ये स्वयंसहाय्यता गट स्थापन झाले असले तरीही योग्य मार्गदर्शनाअभावी अजूनही म्हणावी तशी त्यांची वाटचाल सुरू झालेली नाही. विशेषत: जंगलालगतच्या गावांमध्ये ही कमतरता मोठय़ा प्रमाणावर दिसून येते. गावकऱ्यांच्या सहकार्यातून वन आणि वन्यजीवांचे संवर्धन करणाऱ्या सातपुडा फाऊंडेशनने आता या स्वयंसहाय्यता गटांनाही त्यांच्या क्षमतांची जाण करून देण्यास सुरुवात केली आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील गावांमध्ये अनेक स्वयंसहाय्यता गट आहेत. याच गावात राहणारा आदिवासी या गटाचा भागधारक असून जंगलाशी त्यांचे थेट संबंध आहेत. मात्र, जागरुकता आणि साधनांच्या कमतरतेअभावी पूर्णपणे त्यांच्यातील क्षमतांचा वापर आदिवासींकडून केला जात नाही. आदिवासींनी त्यांच्या क्षमतांचा वापर केला तर आर्थिकदृष्टय़ाही त्यांना सक्षम केले जाऊ शकते, हे सातपुडा फाऊंडेशनने ओळखून आदिवासींमधील क्षमता हेरून त्यांच्यात जनजागृती सुरू केली आहे. आदिवासींच्या या स्वयंसहाय्यता गटाकरिता असलेल्या योजना, त्यांना असलेली संधी आदींशी त्यांना परिचित करणे झाले आहे. त्यांच्यात जनजागृती करण्यासाठी आणि त्यांना त्यांच्यातील क्षमतांची जाण करून देण्याच्या दृष्टीने पेंच व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमधल्या गावांमध्ये बैठका घेणे सुरू झाले आहे. या माध्यमातून त्या गावांमधील आदिवासी समुदाय स्वयंसहाय्यता गटाला जोडला जात आहे. त्यांच्या माध्यमातून जंगल आणि वन्यजीवांच्या संवर्धनासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे सातपुडा फाऊंडेशनचे संवर्धन अधिकारी साकेत अगस्ती यांनी सांगितले.
रामटेक तालुक्यातील सावरा नावाच्या गावातून त्याचा प्रत्ययसुद्धा आला आहे. या गावात १५ गावकऱ्यांचा एक गट तयार करण्यात आला आहे. शेतीपासून मिळणाऱ्या नियमित वेतनाव्यतिरिक्त रिसॉर्ट्स आणि इतर ठिकाणी आदिवासी नृत्यांच्या सादरीकरणातून त्यांच्या अर्थकारणाला आधार मिळाला आहे. विशेष म्हणजे, या सादरीकरणातून आदिवासींची सांस्कृतिक मूल्येही जपली जात आहेत. त्यासाठी सातपुडा फाऊंडेशनने त्यांना विशेष प्रशिक्षणही दिले. आतापर्यंत या स्वयंसहाय्यता गटाने नृत्याच्या कार्यक्रमातून सुमारे दोन लाख रुपयावर उत्पन्न मिळवले आहे. आदिवासी आर्थिकदृष्टय़ा सक्षम होण्याबरोबरच जंगल आणि वन्यजीव संवर्धनातही त्यांची मदत होत आहे. मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील खांबा व सातोषा या बफर झोनमधील गावांमध्ये दोन स्वयंसहाय्यता गटाने सेंद्रीय भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांना चांगली बाजारपेठ मिळावी म्हणून त्यांना थेट बाजाराशी जोडण्याचे काम सातपुडा फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू झाले आहे. सुरुवातीला सेंद्रीय भाजीपाल्यांच्या शेतीसाठी बियाणे पुरवणे, कुक्कुटपालन व्यवसायाकरिता कोंबडय़ा प्रदान करण्याचेही कार्य केले जात आहे. स्वयंसहाय्यता गटासाठी हे छोटेछोटे उपक्रम सहाय्यक ठरतील, असे अनुप अवस्थी म्हणाले.