उरण ते नवी मुंबईदरम्यान नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या नादुरुस्त बसेस चालविण्यात येत असल्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. या बसेस मध्येच बंद पडत असल्यामुळे नोकरदार वर्गाला त्यांच्या कार्यालयात जाण्यास, व्यावसायिकांना इच्छितस्थळी, तर विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास उशीर होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
उरण ते नवी मुंबईदरम्यानच्या महानगरपालिकेची बससेवा ही प्रवाशांसाठी जीवनवाहिनी ठरली आहे. उरण ते नवी मुंबईचा प्रवास करणारे सर्वाधिक प्रवासी या बससेवेचा वापर करीत आहेत. मात्र जलद प्रवासासाठी या सेवेची निवड करणाऱ्या प्रवाशांना सध्या याचा त्रास सहन करावा लागत आहे. या बसेसमध्ये अनेक कारणांनी नादुरुस्त होणाऱ्या बससेच्या संख्येत वाढ झाली आहे. या बसेस भर उन्हात कुठेही बंद पडत आहेत. त्यामुळे प्रवाशांना उशिराने मागून येणाऱ्या बससाठी ताटकळत उभे राहावे लागते. त्याचा त्रास नोकरी, शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थी यांनाही सहन करावा लागत आहे, अशी प्रतिक्रिया उरण येथील व्यावसायिक मनोज ठाकूर यांनी दिली आहे. बस रस्त्यात अचानकपणे बंद पडल्याने मुलांना शाळा, महाविद्यालयात पोहोचण्यासाठी उशीर होत असल्याची तक्रार नवी मुंबईत शिक्षण घेणाऱ्या सुधीर पाटील या विद्यार्थ्यांने केली आहे.
बसेसमध्ये सुधारणा
करण्याचा प्रयत्न
या संदर्भात एनएमएमटीच्या तुर्भे आगाराचे आगारप्रमुख अनिल शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, बसेस रस्त्यात बंद पडू नये म्हणून आम्ही उपाययोजना करीत आहोत. बसेसच्या चाकातील हवा नियमित तपासण्यासह बसेसमध्ये कुठे कुठे बिघाड आहे याची तपासणी केली जात आहे. तांत्रिक बिघाड होऊ नयेत म्हणून दक्षताही घेतली जात आहे. यात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाईल असे त्यांनी सांगितले आहे.