रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या तिकिटांच्या आणि मासिक पासांच्या दरांत वाढ केल्यानंतर ही दरवाढ किमान काही महिने तरी चुकवण्यासाठी मुंबईकरांनी वेगळाच मार्ग स्वीकारला. २५ जूनपासून लागू होणाऱ्या या दरवाढीच्या आधीच प्रवाशांनी त्रमासिक पास काढण्यासाठी रांगा लावल्या. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुख्य स्थानकांवर शनिवारपासूनच पास काढण्यासाठी प्रचंड रांगा लागल्या असून मंगळवारीही मुंबईकरांनी रांगांमध्ये उभे राहणेच पसंत केले. सोमवारी रात्रीही मुंबईतील बहुतांश स्थानकांवर हीच परिस्थिती होती. विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसांत मासिक, त्रमासिक आणि सहामाही पासच्या विक्रीचे प्रमाण वाढले. तसेच या गर्दीला पास देण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने खास सोयही करत तिकीट बुकिंग कर्मचाऱ्यांना दोन दिवस रात्रपाळीत काम करण्याचे आदेश दिले होते.
रेल्वेच्या दरवाढीत मासिक पासचे भाडे दुपटीपेक्षा जास्त वाढल्याने मुंबईकरांचे कंबरडे मोडण्याच्या वाटेवर आहे. मात्र त्यापासून आपला बचाव करण्यासाठी पश्चिम व मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी २५ जूनच्या आधीच आपल्या पासचे नूतनीकरण करण्याचे ठरवले आहे. शनिवार ते सोमवापर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या एकूण तीन लाखांपेक्षा जास्त प्रवाशांनी आपल्या पासचे नूतनीकरण केले आहे. यापैकी बहुतांश प्रवाशांनी एका महिन्याचा पास काढण्यावर भर दिला आहे. मासिक पाससाठी प्रवाशांच्या वाढलेल्या संख्येला पुरे पडण्यासाठी मध्य रेल्वेने पास देण्यासाठी १४ अतिरिक्त खिडक्या उघडल्या आहेत. या खिडक्या मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याण या स्थानकांवर उघडण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेवरही १२ अतिरिक्त खिडक्या उघडत तेथे पास काढणाऱ्यांनाच प्राधान्य देण्यात आले होते. तसेच एटीव्हीएमवर मुख्यत्त्वे तिकिटांसाठी रांग लावण्याचे सुचवण्यात येत होते.