News Flash

आकडय़ांच्या कोडय़ामुळे हजारो प्रवासी ‘टीएमटी’पासून वंचित

बसथाब्यांवरील आकडय़ांच्या कोडय़ामुळे हजारो प्रवासी इच्छा आणि गरज असूनही ‘टीएमटी’च्या सेवेपासून वंचित राहात असल्याची बाब उघडकीस आली

| May 22, 2014 12:40 pm

बसथाब्यांवरील आकडय़ांच्या कोडय़ामुळे हजारो प्रवासी इच्छा आणि गरज असूनही ‘टीएमटी’च्या सेवेपासून वंचित राहात असल्याची बाब उघडकीस आली असून शहर वाहतूक व्यवस्थेतील ही ठळक उणीव दूर केल्यास प्रवाशांची सोय होऊन परिवहन सेवेच्या उत्पन्नातही घसघशीत वाढ होण्यास मदत होणार आहे.    
रडत-रखडत धावणाऱ्या टीएमटीच्या ताफ्यात आता नव्या २३० बसेसची भर पडणार असली तरी चांगले दिवस येण्यासाठी ठाणे शहराच्या या परिवहन सेवेस आपल्या कार्यपद्धतीतील काही मुलभूत दोष दूर करावे लागणार आहेत. त्यातील एक मुख्य त्रुटी म्हणजे टीएमटीच्या शहरातील थांब्यांवर त्या मार्गावरून धावणाऱ्या बसेसचे केवळ क्रमांक लिहिलेले आहेत. मात्र विशिष्ट क्रमांकाची बस कुठली, ती कोणकोणत्या मार्गावरून धावते, याची सविस्तर नोंद असणारे फलक थांब्यांवर नसल्याने प्रवाशांना कोणताही अर्थबोध होत नाही. मुंबईतील बेस्टच्या सर्व थांब्यांवर त्या मार्गे धावणाऱ्या प्रत्येक बसची सविस्तर माहिती असते. टीएमटीने फक्त सुरुवातीच्या ठिकाणी तशा प्रकारची माहिती प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली आहे. मात्र पुढील प्रवासात अशी कोणतीही माहिती नसल्याने नेहमी त्या मार्गाने न जाणाऱ्या अथवा शहराबाहेरील प्रवाशांची मोठी गैरसोय होते.
तब्बल १४७ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणाऱ्या ठाणे महापालिका क्षेत्रात तब्बल २० लाख नागरिक राहतात. मात्र त्यातील जेमतेम दहा ते बारा टक्के म्हणजे अडीच लाख प्रवासी दररोज ‘टीएमटी’ने प्रवास करतात. सध्या कागदोपत्री टीएमटीच्या ताफ्यात ३११ बस असल्या तरी प्रत्यक्षात त्यातील अवघ्या १८० बस रस्त्यावर आहेत. विविध ६८ मार्गावर टीएमटीच्या दिवसभरात ५ हजार ९९६  फेऱ्या होतात. एक बस सरासरी १९५ किलोमीटर धावते. महापालिका क्षेत्रात टीएमटीचे एकूण ३७४ बसथांबे आहेत. या सर्व बसथांब्यांवर सध्या असलेली निव्वळ आकडय़ांची हेराफेरी दूर करून त्या मार्गावरील सर्व थांब्यांची नावे नोंदविल्यास प्रवासी संख्या किमान दुपटीने वाढू शकेल. सध्या टीएमटीचे दररोजचे उत्पन्न १८ लाख ५० हजार रुपये असून अशा प्रकारचे प्रवासीस्नेही धोरण अवलंबिल्यास ते सहज ३५ ते ४० लाख रुपयांपर्यंत जाऊ शकेल.
चूक मान्य, लवकरच सुधारणा
यासंदर्भात टीएमटीचे महाव्यवस्थापक देवीदास टेकाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी टीएमटी व्यवस्थापनातील ही चूक मान्य करून लवकरच त्यात सुधारणा करण्यात येईल, असे ‘वृत्तान्त’शी बोलताना सांगितले. त्यामुळे आता टीएमटीच्या प्रत्येक थांब्यावर त्या मार्गावरून धावणाऱ्या सर्व फेऱ्यांचे सविस्तर तपशील वाचायला मिळतील, अशी आशा करायला हरकत नाही.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 12:40 pm

Web Title: commuting in thane may get better after city transport get 230 new buses
Next Stories
1 कल्याण-डोंबिवलीत बसथांबेच नाहीत
2 ठाण्यातील ‘बिच्चाऱ्यां’ची धुसफूस टोकाला
3 टिटवाळ्यात चोरटय़ांचा धुमाकूळ
Just Now!
X