राज्यभरातून स्पर्धा परीक्षांसाठी बसणाऱ्या तरुणांची संख्या लक्षात घेऊन शिवसेना आणि ‘युवा सेना’तर्फे अशा स्पर्धा परीक्षा देण्यास उत्सुक असलेल्या तरुणांसाठी वर्षभर विनामूल्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नावनोंदणीही केली आहे. राज्यभरातून आलेल्या सर्व पदवीधर उमेदवारांच्या अर्जाची तपासणी केल्यानंतर या सर्वाना रविवार, पाच जानेवारी रोजी ११ ते १ या वेळेत लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे.
शिवसेना व युवा सेना यांनी ‘आयएएस’ आणि ‘आयपीएस’ होऊ इच्छिणाऱ्यांसाठी विनामूल्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. त्यासाठी नाव नोंदवलेल्या अर्जदारांची परीक्षा मुंबईतील दहिसर, अंधेरी, दादर, माटुंगा, चेंबूर आणि परळ या सहा ठिकाणी तसेच पुणे, नांदेड, नागपूर, उस्मानाबाद आणि नाशिक या पाच ठिकाणी घेतली जाणार आहे. परीक्षेनंतर किमान शंभर विद्यार्थ्यांची निवड विनामूल्य प्रशिक्षण शिबिरासाठी करण्यात येणार आहे. पाच जानेवारी रोजी होणाऱ्या या परीक्षेचा निकाल ११ जानेवारी रोजी लागणार आहे. त्यानंतर यशस्वी विद्यार्थ्यांना सात दिवसांच्या कालावधीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यानंतर २३ जानेवारीपासून मुंबईत प्रशिक्षण वर्ग सुरू होणार आहेत. या उपक्रमाची अधिक माहिती शिवविद्या प्रबोधिनीच्या http://www.shivvidyaprabodhini.co. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.