उरण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि मनसे या चार पक्षांच्या कार्यकर्त्यांविरोधात विना परवाना वाहनांवर स्टीकर लावणे, बॅनर लावणे तसेच सार्वजनिक रस्त्यावर पक्षाचे प्रचार कार्यालय उभारल्याच्या कारणावरून उरण तसेच न्हावा शेवा पोलिसांनी गुन्हे दाखल करून दंड आकारले आहेत. काँग्रेसचे उमेदवार महेंद्र घरत यांना न्हावा शेवा पोलिसांना विना परवाना वाहनावर स्टीकर लावल्याने पाच हजारांचा दंड आकारला आहे.
उरण विधानसभा मतदारसंघात मनसे व राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी परवानगी न घेताच वाहनांवर स्टीकर लावल्याचे आढळून आले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती उरणचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांनी दिली आहे. तसेच भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ गव्हाण येथे भाऊ पाटील यांनी निवडणूक आयोगाची कोणतीही परवागनी न घेता रस्त्यातच प्रचाराचा मंडप घातल्याने कारवाई केल्याची माहिती न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश देवरे यांनी दिली आहे.