रेणुका शुगर्स संचलित पंचगंगा कारखान्याच्या धुराडय़ातून हवेत उडणाऱ्या राखेच्या कणांमुळे प्रदूषण नियंत्रण कायद्याचा भंग होत असून, कारखाना परिसरातील लाखभर लोकांना त्याचा त्रास होत आहे. या संदर्भात कारवाई करण्याचे आश्वासन देऊनही तेथे शासकीय अधिकाऱ्यांनी पाळले नाहीत. तसेच नरंदेगावातील १० एकर जमिनीतील अतिक्रमण अद्यापही हटविलेले नाही. या दोन्ही प्रकरणी २९ डिसेंबर रोजी इचलकरंजी प्रांत कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येणार आहे, असा इशारा आण्णा हजारेप्रणीत भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनचे कोल्हापूर जिल्हा माजी कार्याध्यक्ष सुरेश गडगे यांनी प्रांत तुषार ठोंबरे यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
कबनूर, गंगानगर, यड्राव या रस्त्यावरील रेणुका शुगर्सने बेकायदेशीर अतिक्रमण करून फ्लाय ओव्हर कॅरीअर ब्रीज उभारले आहेत ते काढून टाकण्यात यावे, तसेच या साखर कारखान्याच्या धुराडय़ातून हवेत उडणाऱ्या राखेच्या कणांमुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियम १९८१चा भंग होत आहे. याबाबत कारवाई करण्यासाठी गतवर्षी ३० डिसेंबर रोजी निवेदन दिले होते.
तारदाळ, खोतवाडी तलाठी कार्यालयातील सातबारा पुस्तक व डायरी नोंदणीमध्ये करण्यात आलेल्या बेकायदेशीर दफ्तराची तपासणी करून कारवाई करावी, याबद्दलही निवेदन दिले होते. नरंदे येथील शासकीय हक्कातील गट क्रं.११८९ मधील १० एकर जमिनीचा अनधिकृतपणे वापर सुरू आहे. शरद सहकारी साखर कारखान्याने या जागेचा वाहनतळ म्हणून वापर सुरू आहे. या सर्व प्रकरणी वारंवार तक्रारी करूनही शासकीय अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत, याच्या निषेधार्थ २९ डिसेंबर रोजी इचलकरंजी प्रांत कार्यालयासमोर आत्मदहन केले जाणार आहे, असे गडगे यांनी पत्रकात म्हटले आहे.