तक्रारकर्त्यांने महसूल आयुक्तांकडे दाद मागितली
अनेक प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या नांदुरा येथील तहसीलदार गणेश पाटील यांच्याविरुध्द सतीश देवकिसन लढ्ढा, रा.नांदुरा यांनी दाखल केलेल्या तक्रारीची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने अखेर सतीश लढ्ढा यांनी अमरावतीच्या महसूल आयुक्तांकडे धाव घेतली आहे.
सतीश लढ्ढा यांनी तक्रारीत नमूद केल्यानुसार तहसीलदाराविरूद्ध मुद्देनिहाय चौकशीची मागणी केली आहे. तहसीलदारपदी नियुक्ती झाल्यापासून ते प्रभारी मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारेपर्यंत पाटील यांनी अनेक वादग्रस्त विषय हाताळून ते जनतेच्या रोषास कारणीभूत ठरले. या प्रकरणात वरिष्ठांकडे तक्रारी होऊनही वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने अद्याप ठोस कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. ५ एप्रिलला सतीश लढ्ढा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यात त्यांनी पहिल्याच मुद्दय़ात ते पालिकेचे मुख्याधिकारी असतांना पालिका आवारातील जुने बांधकाम असलेली दोन मजली इमारत जमीनदोस्त केली होती. त्याचबरोबर शिवाजी चौकातील संकुलाला लागून असलेली सुस्थितीतील स्वच्छतागृह तोडून टाकले असल्याचे म्हटले आहे. परिणामी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून लाखो रुपयांची बोगस बिले काढण्यात आलेली असतांना तक्रारीनुसार त्यांची चौकशी झाली नाही. मुद्या क्र. २ मध्ये तहसीलदारपदाचा दुरुपयोग करून अवैध मार्गातून लाखो रुपयांची बेहिशेबी मालमत्ता गोळा केली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. खामगाव येथे घाटपुरीमध्ये मुलाचा ८० ते ९० लाख रुपयांचा टोलेजंग बंगला बांधण्यात आला. त्यासाठी शहरातील अवैध धंदेवाल्यांकडून वाळू, विटा, सिमेंट घेण्यात आले आहे. त्याची चौकशीही प्रलंबित आहे. मुद्या क्र.३ मध्ये के दार नदीतील विनापरवाना लाखो ब्रास वाळू उपसा करण्यास ठेकेदार रेड्डी यास गणेश पाटील यांनी परवानगी  दिली होती. परिणामी, तक्रारीनंतर त्यास पाच कोटींचा दंड झाल्याचे सर्वविदीत आहे. आदी अनेक प्रकरणात तहसीलदार गणेश पाटील यांनी शासनाचा महसूल बुडवून बेहिशेबी मालमत्ता जमा केल्यानंतरही जिल्हास्तरावरून त्याची साधी चौकशीही झाली नसल्याने अखेर सतीश लढ्ढा यांनी महसूल आयुक्त, अमरावती यांना तक्रार अर्ज देऊन न्यायाची मागणी केली आहे.