पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रांमध्ये चुका झाल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना चूक केल्यामुळे या चुका झाल्याची शक्यता असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. संपदा जोशी यांनी सोमवारी सांगितले.
पुणे विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ शनिवारी झाला. या वेळी देण्यात आलेल्या प्रमाणपत्रांमध्ये अनेक चुका असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांनी एका शाखेमध्ये शिक्षण घेतले, मात्र प्रमाणपत्रामध्ये दुसऱ्याच विद्याशाखेची पदवी देण्यात आली आहे. काही विद्यार्थ्यांच्या नावात चुका झाल्या आहेत, तर काही विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रावर चुकीची श्रेणी आल्याची विद्यार्थ्यांची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.
याबाबत परीक्षा नियंत्रक संपदा जोशी यांनी सांगितले, ‘‘अनेक चुका या विद्यार्थ्यांच्या निष्काळजीपणामुळे होत असतात. विद्यापीठाकडून अजिबात चुका होतच नाहीत असे नाही. पण प्रत्येक वेळी विद्यापीठाला दोषी ठरवणे योग्य नाही. विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रमाणपत्रासाठीचे अर्ज चुकीचे भरले असतील तर त्या चुका त्यांच्या प्रमाणपत्रांमध्ये होणारच. पदवी दान समारंभाच्या दिवशी २५ हजार विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. मात्र, त्या वेळी विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र देणाऱ्या कक्षाकडे चूक झाली असल्याची तक्रार केली नाही. तरीही ज्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रामध्ये चुका झाल्या असतील त्यांना त्या लवकरात लवकर सुधारून देण्यात येतील.’’
परीक्षाच्या वेळी हजेरीची ‘ऑनलाईन’ नोंद
विद्यार्थी परीक्षेला उपस्थित असूनही गुणपत्रकात गैरहजर दिसत असल्याचे प्रकार विद्यापीठामध्ये यापूर्वी घडले आहेत. यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी परीक्षा केंद्राकडून परीक्षेच्या कालावधीतच ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येणार आहे. यापूर्वी विद्यार्थी परीक्षेला बसल्याची नोंद कॅप सेंटरकडे जमा होत होती. विद्यार्थी परीक्षा देत असताना पर्यवेक्षकाकडून लेखी हजेरी लिहून ती कॅप सेंटरकडे पाठवली जात होती. या प्रक्रियेमधील चुका टाळण्यासाठी परीक्षेच्या दिवशी ऑनलाईन हजेरी घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे, अशी माहिती डॉ. जोशी यांनी दिली.