महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने मुलाखती घेण्याचे व उमेदवारी ठरवण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर कोणालाही दिलेले नाहीत, परंतु तरीही काही जण मुलाखतींचा फार्स करून उमेदवारीची परस्पर ‘कमिटमेंट’ देत आहेत. तशा तक्रारी कार्यकर्त्यांनी आपल्याकडे केल्याचा गौप्यस्फोट पक्षाचेच मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला.
मंत्री विखे यांनी आज शहरातील त्यांच्या गुलमोहर रस्त्यावरील ‘आशीर्वाद’ या निवासस्थानी मनपा निवडणुकीतील इच्छुकांच्या स्वतंत्रपणे भेटी घेऊन चर्चा केली. शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांच्या अनुपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास बहुतेक प्रभागातील इच्छुक उपस्थितीत होते. या सर्वाची प्रारंभी एकत्रित व नंतर बंद खोलीत विखे यांनी चर्चा केली. सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत या भेटी व चर्चेचा कार्यक्रम सुरू होता. दोनच दिवसांपूर्वी विखे यांनी शहरातील त्यांच्या समर्थकांची बुरुडगाव रस्त्यावर गोपनीय बैठक घेऊन निवडणूक हलचालींना सुरुवात केली होती. त्याचवेळी आजच्या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते.
इच्छुकांसह ज्येष्ठ नेते सुवालाल गुंदेचा, युवकचे अध्यक्ष राहुल झावरे, नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार व सुभाष लोंढे, उबेद शेख, महिला शहर जिल्हाध्यक्ष सविता मोरे, संजय मोरे, डॉ. अविनाश मोरे आदी उपस्थित होते. आजची बैठक मुलाखतींसाठी नव्हती व उमेदवारीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असे विखे म्हणाले. शहर जिल्हाध्यक्षांच्या अनुपस्थितीकडे लक्ष वेधले असता, विखे म्हणाले, माझे काही त्यांच्याशी मतभेद नाहीत. ते त्यांच्या पद्धतीने काम करतात, ते असल्याने फार काही फरक पडत नाही! माझ्या सर्व कार्यक्रमांना शहर जिल्हाध्यक्षांनी उपस्थित राहावे, असे काही नाही. विळद घाटातील कार्यक्रमामुळे मी आज नगरमध्येच होतो, त्यामुळे इच्छुकांनीच भेटण्यासाठी वेळ मागितली, त्याप्रमाणे चर्चा झाली.
मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी होणार की नाही, याचा प्रदेश पातळीवर निर्णय होईल. अद्याप आघाडीबाबत काही निर्णय झालेला नाही. आघाडी करावी की नाही, याबद्दल मला कोणी विचारलेही नाही, असेही विखे यांनी एका प्रश्नाच्या उत्तररात स्पष्ट केले.
मनपा निवडणुकीबाबत उद्या (मंगळवारी) मुंबईत प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मी, बाळासाहेब थोरात, निरीक्षक शरद रणपिसे यांची बैठक होणार आहे. या बैठकीत प्रभागात जाऊन चाचपणी करण्यासाठी स्थानिक पातळीवरील समन्वय समिती निर्माण केली जाणार आहे, ही समिती संसदीय समितीला अहवाल देईल, त्यानुसार निवडणूक धोरण ठरेल. उद्या होणाऱ्या बैठकीत आघाडी व जागा वाटपाचे धोरण यावरही चर्चा होऊ शकते, अशी माहिती विखे यांनी दिली.
नगरला तळ ठोकणार!
मनपा निवडणुकीसाठी पक्षाला नेतृत्व नसल्याकडे लक्ष वेधत काही इच्छुकांनी मंत्री विखे यांना नेतृत्व करण्याची गळ घातली. विखे यांनीही त्यास मान्यता देत निवडणुकीसाठी आपण स्वत: नगरमध्ये चार-पाच दिवस थांबून प्रत्येक प्रभागात जाऊ, असेही अश्वासन दिले. निवडणुकीसाठी पक्षाने ‘टिम वर्क’ पद्धतीने काम करावे, असे सांगताना त्यांनी जाहीरनामा तयार करण्याची सूचना केली.