पोलीस उपनिरीक्षकांच्या राज्यातील चारशे रिक्त जागा खात्यांतर्गत भरण्यासाठी शुक्रवारी राज्यभर लेखी परीक्षा घेण्यात आली. नाशिक केंद्रावरील परीक्षेबाबत आता तक्रारी होऊ लागल्या आहेत. गृह विभागाने बंदी घातलेले खासगी प्रकाशकाचे पुस्तक येथे सर्रास वापरण्यात आले. विशेष म्हणजे मूळ प्रश्नपत्रिका व यातील प्रश्नपत्रिका बरीचशी मिळती-जुळती होती असा आक्षेप काही परीक्षर्थीनीच घेतला आहे.
पोलीस खात्यात दहा वर्षे सेवा झालेले कर्मचारी या परीक्षेस पात्र आहेत. राज्य सरकारने प्रकाशित केलेले पुस्तक (बियर अॅक्ट) लेखी परीक्षेला घेऊन बसण्यास मुभा आहे. त्यात पाहून उत्तरे लिहिता येतात. मात्र नाशिक केंद्रावर गृह विभागाने बंदी घातलेले खासगी प्रकाशकाचे पुस्तक अनेक परीक्षार्थीनी वापरल्याची तक्रार करण्यात येते. विशेष म्हणजे या पुस्तकातील सराव प्रश्नपत्रिका व परीक्षेची प्रश्नपत्रिका यात बरेच साम्य होते असेही सांगण्यात येते, त्यामुळेच याबाबत साशंकता व्यक्त होते. राज्य सरकारने प्रकाशित केलेले पुस्तक घेऊन परीक्षा दिलेल्या उमेदवारांमध्ये अन्यायाची भावना व्यक्त होते.
राज्यातील विविध केंद्रांवर सुमारे चाळीस हजार पोलीस या परीक्षेला बसले आहेत. पोलिसांच्या दैनंदिन कामकाजाशी संबंधित प्रश्नच या परीक्षेत विचारण्यात येतात. नगरसह धुळे, जळगाव, नंदुरबार व नाशिक अशा पाच जिल्ह्य़ांची परीक्षा नाशिक केंद्रावर झाली. फौजदारी दंड प्रक्रिया व भारतीय दंड विधान कायदा या विषयाचा पेपर होता. त्यासाठीच काहींनी हे खासगी पुस्तक वापरल्याची तक्रार करण्यात येते. काही परीक्षार्थींनीच ‘लोकसत्ता’ ला ही माहिती दिली.
 यासंदर्भात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक धनंजय कमलाकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या प्रकाराचा इन्कार केला. ते म्हणाले, असे काहीही झालेले नाही. या परीक्षेत केवळ राज्य सरकारने प्रकाशित केलेले पुस्तक वापरण्यास परवानगी दिलेली आहे. परीक्षार्थीनी चुकीची माहिती पसरवली असावी. अन्यथा त्यांनी वेळीच आमच्याकडे येथेच तक्रार करायला हवी होती. मात्र तरीही या प्रकाराची चौकशी करून शहानिशा केली जाईल असे त्यांनी सांगितले.