उपनगरीय प्रवाशांना तिकीट खिडक्यांवरील रांगांपासून मुक्ती देण्यासाठी भारतीय रेल्वेने सुरू केलेली मोबाइल तिकीट प्रणाली ‘कागदविरहित’ झाल्यापासून या प्रणालीबाबत प्रवाशांना अडचणी जाणवू लागल्या आहेत. गेल्या आठवडाभरात १३९ प्रवाशांनी विविध कारणांसाठी सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टीमकडे (क्रिस) तक्रारी नोंदवल्या आहेत. यापैकी सर्वात जास्त म्हणजे ५८ तक्रारी अ‍ॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड होत नसल्याबद्दल किंवा मोबाइलमध्ये असलेले अ‍ॅप वापरणे शक्य नसल्याबद्दल आहेत. संबंधित अ‍ॅप डाऊनलोड करताना ते सिमकार्ड आणि मोबाइल हॅण्डसेट या दोन्हींशी संलग्न होते. यापैकी एक गोष्ट बदलली, तरी हे अ‍ॅप चालणे शक्य नसल्याचे ‘क्रिस’कडून सांगण्यात येत आहे.

पश्चिम रेल्वेवर कागदविरहित मोबाइल तिकीट प्रणाली ८ जुलैपासून सुरू झाल्यावर गेल्या आठवडाभरात २२ हजार लोकांनी हे ‘यूटीएस’ अ‍ॅप डाऊनलोड केले. तसेच याआधी हे अ‍ॅप असलेल्यांनी ते अपडेटही केले. मात्र हे अ‍ॅप वापरण्यात आणि या अ‍ॅपवरून तिकीट काढण्यात अडचण येत असल्याच्या १३९ तक्रारी ‘क्रिस’कडे दाखल झाल्या आहेत. यापैकी सर्वाधिक म्हणजे ५८ तक्रारी हे अ‍ॅप मोबाइलमध्ये असूनही वापरता येत नसल्याबद्दल किंवा नवीन घेतलेल्या मोबाइलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड होत नसल्याबद्दल आहेत, असे ‘क्रिस’च्या मुंबई विभागाचे महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी सांगितले.
मोबाइल तिकीट प्रणालीसाठी आवश्यक ‘यूटीएस’ हे अ‍ॅप वापरकर्त्यांच्या मोबाइल संचाशी आणि सिमकार्डशी संलग्न असते. यात मोबाइलचा ‘आयएमईआय’ क्रमांक आणि सिमकार्ड क्रमांक दोन्हीही या अ‍ॅपमध्ये नोंदवले जाते. यापैकी एक क्रमांक बदलल्यास हे अ‍ॅप काम करेनासे होते. अनेक प्रवाशांनी नवीन मोबाइल संच घेतल्यास किंवा त्याच मोबाइल संचात नवीन सिमकार्ड टाकल्यास हे अ‍ॅप बंद पडते. या अ‍ॅपचा गैरवापर टाळण्यासाठी हा सुरक्षा उपाय करण्यात आल्याचे बोभाटे यांनी स्पष्ट केले.
मात्र, अशा प्रकारे सिमकार्ड अथवा मोबाइल संच बदलल्यावर हे अ‍ॅप वापरणे अथवा डाऊनलोड करणे शक्य होत नसल्यास प्रवाशांनी ‘क्रिस’शी संपर्क साधावा, असे आवाहनही बोभाटे यांनी केले आहे. प्रवासी utsonmobile@cris.org.in  या ईमेल आयडीवर आपली तक्रार नोंदवू शकतात. या तक्रारीत मोबाइल संच बदलला असल्यास मोबाइल संचाचा आयएमईआय क्रमांक किंवा सिमकार्ड बदलले असल्यास नवीन मोबाइल क्रमांक देणे अनिवार्य आहे. त्यानंतर क्रिसचे अभियंते हे अ‍ॅप आणि मोबाइल संच व सिमकार्ड पुन्हा संलग्न करतील, असेही बोभाटे यांनी सांगितले.