पारनेरचे ग्रामदैवत श्री नागेश्वराची महापुजा सालाबादप्रमाणे यावर्षीही उत्साहात पार पडली. तालुक्यासह राज्याच्या विविध भागातील हजारो भाविकांनी शनिवारी महापुजेनिमित्त काढण्यात आलेल्या पालखीचे दर्शन घेतले.
पारंपारीक रूढी परंपरेप्रमाणे प्रत्येक श्रावण मासात महिनाभर नागेश्वरास लघुरूद्राभिषेक करण्यात आल्यानंतर महापुजेने उत्सवाची सांगता झाली. दरवर्षी या महापुजेचा मान शहरातील वेगळ कुटुंबास दिला जातो. यंदा संतोष शेटे यांच्या कुटुंबियांनी महापुजेचा मान स्वीकारला होता. शनिवारी दुपारी पालखी मंदिरात पोहचल्यानंतर नागेश्वरांची आरती करण्यात आली. या सोहळयासाठी परीश्रम घेतलेल्या विविध कार्यकर्त्यांंचा यावेळी सन्मान करण्यात आला. आमदार विजय औटी, गुणेश पारनेरकर, गणपतराव देशमुख, संजय वाघमारे, उपसरपंच नंदकुमार देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.
पावसासाठी साकडे
महापुजेच्या समाप्ती सोहळ्यात आमदार विजय औटी यांनी श्री नागेश्वराला आगामी काळात भरपूर पावसाचे साकडे घातले. गेल्या काही वर्षांंत नागरीकांच्या सहकार्याने आपण मंदीर परीसराचा चेहरा मोहरा बदलल्याचे सांगून हा उत्सव पुढील काळात असाच उत्साहाने पार पाडण्याचे अवाहन त्यांनी केले.