05 July 2020

News Flash

डाळिंबाची विक्री कॅरेटऐवजी किलोवर करण्याची सक्ती; व्यापाऱ्यांचा बहिष्कार

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने डाळिंबाची विक्री कॅरेटऐवजी किलो वजनावर करण्याची सक्ती केल्यामुळे आडत्यांकडून होणाऱ्या डाळिंबाच्या लिलावावर व्यापाऱ्यांनी बहिष्कार घातला आहे. शेतकऱ्यांनीही बाजार समितीत विक्रीसाठी

| March 6, 2013 09:38 am

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने डाळिंबाची विक्री कॅरेटऐवजी किलो वजनावर करण्याची सक्ती केल्यामुळे आडत्यांकडून होणाऱ्या डाळिंबाच्या लिलावावर व्यापाऱ्यांनी बहिष्कार घातला आहे. शेतकऱ्यांनीही बाजार समितीत विक्रीसाठी डाळिंब न आणल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून डाळिंबाची विक्री जवळपास ठप्प झाली आहे. यात सुमारे तीन कोटींची उलाढाल थांबल्याचे सांगण्यात आले.
सोलापूर जिल्हा डाळिंब उत्पादनात राज्यात दुसऱ्या स्थानावर आहे. एकीकडे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला असला तरी काही शेतकरी मोठय़ा कष्टाने डाळिंबाच्या बागा जगवत आहेत. सद्याच्या दुष्काळी स्थितीतही सोलापूरच्या डाळिंबाची युरोप व आखाती देशांमध्ये निर्यात होते. सोलापूर बाजार समितीत सांगोला. पंढरपूर, इंदापूर, संगमनेर आदी भागांतील डाळिंब उत्पादक शेतकरी माल विक्रीसाठी बाजार समितीत आणतात. दररोज दहा हजार कॅरेट म्हणजे सुमारे दोन लाख किलो डाळिंब विक्रीसाठी बाजार समितीत येतो. एका कॅरेटला साधारण: एक हजाराचा दर गृहीत धरला तरी दररोज एक कोटीची आर्थिक उलाढाल डाळिंबाच्या माध्यमातून होते. गणेश व भगवा या दोन नावाजलेल्या जातींच्या डाळिंबाच्या खरेदीसाठी आंध्र प्रदेशातील राजमहेंद्री, विजयवाडा तसेच विशाखापट्टणम, भुवनेश्वर व कटक तसेच बंगळुरू व कोलकातापर्यंतचे व्यापारी सोलापुरात येतात.
दरम्यान, राज्य पणन महासंघाच्या सूचनेप्रमाणे सोलापूर कृषी बाजार समितीने आडत्यांना डाळिंबाची विक्री कॅरेटऐवजी किलो वजनावर करण्याचे बंधन घातले आहे. मात्र आंध्रात व अन्य राज्यात डाळिंबाची विक्री कॅरेटवरच (नग अथवा डझन) होत असल्यामुळे त्या भागातील व्यापाऱ्यांनी किलोऐवजी कॅरेटवरच डाळिंबाची विक्री व्हावी, असा आग्रह धरला आहे. परंतु बाजार समितीने त्यास नकार देत किलो वजनावरच डाळिंबाच्या विक्रीची सक्ती केल्यामुळे व्यापारी नाराज आहेत. त्यामुळे आडत्यांकडून होणाऱ्या डाळिंबाच्या लिलावावर व्यापाऱ्यांनी बहिष्कार घातला आहे. गेल्या तीन दिवसांपासून हा बहिष्कार सुरूच आहे.
व्यापाऱ्यांच्या या बहिष्कार अस्त्रामुळे शेतकऱ्यांना डाळिंब कॅरेटमागे १२०० रुपयांऐवजी ७००रुपये दरापर्यंत विकावे लागेल. त्यातच काही शेतकऱ्यांनी प्राप्त परिस्थितीचा विचार करून बाजार समितीत डाळिंब पाठविणे बंद केले आहे. त्याऐवजी आपला माल पुणे व मुंबईकडे पाठविण्यावर भर दिला आहे.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2013 9:38 am

Web Title: compulson on of pomegranate sale in kilo instead of carat
Next Stories
1 अक्कलकोटमध्ये बारा दिवसांआड पाणीपुरवठा; नागरिकांचे हाल सुरूच
2 लेक वाचवा’ उपक्रमामुळे कोल्हापुरात मुलींच्या प्रमाणात वाढ – हर्षवर्धन पाटील
3 समतोल विकासासाठी जिल्हा परिषदेने कृती आराखडा तयार करावा – पाटील
Just Now!
X