16 January 2021

News Flash

संगणक साक्षरता यापुढे महत्त्वाची – मुख्यमंत्री

आता संगणक साक्षरता किती प्रसारित झाली हे महत्त्वाचे बनले आहे. मुठीत सामावलेले तंत्रज्ञान सर्व थरामध्ये पोहोचण्याची गरज आहे, यासाठी शिक्षकांनी प्रगत तंत्रज्ञान अवगत केले पाहिजे.

| September 6, 2013 02:32 am

साक्षरतेचे प्रमाण ८२ टक्क्य़ांवर पोहचले आहे, पण आता अशाप्रकारची साक्षरता मोजून उपयोगी नाही. याऐवजी संगणक साक्षरता किती प्रसारित झाली हे महत्त्वाचे बनले आहे. मुठीत सामावलेले तंत्रज्ञान सर्व थरामध्ये पोहोचण्याची गरज आहे, यासाठी शिक्षकांनी प्रगत तंत्रज्ञान अवगत केले पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.     
शालेय शिक्षण विभागाच्या वतीने येथील शाहू सांस्कृतिक हॉलमध्ये राज्य शिक्षक पुरस्कार वितरणसमारंभ आयोजित केला होता. या वेळी १०५ पुरस्कार विजेत्या शिक्षकांचा सत्कार मुख्यमंत्री चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. पुरस्कार विजेत्या शिक्षकांना १० हजार रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह याबरोबरच टॅब्लेट व दोन वेतनवाढी देण्यात आल्या.                       जागतिक नेतृत्व करण्यासाठी दर्जेदार शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असे नमूद करून मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, त्यासाठी राज्य शासनाने इंग्रजी व गणित शिक्षकांना प्रशिक्षित करणारा उपक्रम हाती घेतला आहे. शिक्षणाच्या बाबतीत काहीही कमतरता राहणार नाही, याची दक्षता शासन घेत आहे. बालभारतीचे पुस्तक ईबुक रूपामध्ये तसेच आयपॅडवर उपलब्ध करण्यात आले आहे. कागदाशिवाय शिक्षण या दिशेने वाटचाल केली जात आहे. शासनाच्या या प्रयत्नाला शिक्षकांनी साथ दिली पाहिजे. मुक्त विद्यापीठातून उच्च शिक्षण घेऊन शिक्षकांनी स्वतला अधिक सक्षम बनविले पाहिजे. शिक्षणाचा विस्तार होण्यासाठी खासगी महाविद्यालये काढण्यास शासनाने परवानगी दिली. पण तेथे गुणवत्ता वाढली की संस्थाचालकांचे बंगले वाढले हे शोधण्याची वेळ आली आहे.     
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, व्हच्र्युअल क्लासरूम सारख्या संकल्पना ग्रामीण भागामध्ये रुजत चालल्या आहेत. अशावेळी शिक्षकांनी हाय-फाय नव्हे तर वाय-फाय होण्याची गरज निर्माण झाली आहे. नवी पिढी टेक्नोसॅव्ही असताना शिक्षकांनी नव्या पिढीचा कल लक्षात घेवून आपल्यामध्ये तांत्रिक बदल केले पाहिजेत.तरच शिक्षक व विद्यार्थ्यांतील नाते मजबूत होईल.     
शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी राज्यातील शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले, ६७ हजार प्राथमिक व २० हजार माध्यमिक शिक्षकांना ब्रिटिश कौन्सिलच्या माध्यमातून इंग्रजीत पारंगत होण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. देशात महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीत खालच्या क्रमांकावर होता. आता तो वरच्या क्रमांकाच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. शिक्षण विभाग नेहमीच टिकेच्या रडावर असतो. मात्र २८ लाख विद्यार्थी दहावीची परीक्षा देत असताना एकदाही पेपर फुटीचा प्रकार घडला नाही. निकाल वेळेवरच लागला. याचे श्रेय शिक्षकांचे असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.     
पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, कामगारमंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव सहारिया यांची भाषणे झाली. कार्यक्रमास महापौर प्रतिभा नाईकनवरे, जि.प.अध्यक्ष प्रा.संजय मंडलिक, आमदार डॉ.सा.रे.पाटील, आमदार के.पी.पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यासह वरिष्ठ शासकीय अधिकारी, शिक्षक उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2013 2:32 am

Web Title: computer literacy is important in new era cm
टॅग Important
Next Stories
1 मोबाईल बँकिंगव्दारे आता बँक सेवा ग्रामीण भागापर्यंत
2 दौलत साखर कारखान्यावर कोल्हापूर जिल्हा बँकेचाच ताबा
3 शिक्षण व्यवस्थेत रचनात्मक बदल होण्याची गरज-जयंत पाटील
Just Now!
X