News Flash

जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘संगणक’ आवडे चोरांना

जिल्हाधिकारी कार्यालयातील महत्वपूर्ण विभागाच्या संगणकांवर पुन्हा एकदा चोरटय़ांची वक्रदृष्टी पडली असून मंगळवारी मध्यरात्री चार संगणक त्यांनी पुन्हा एकदा गायब केले आहेत.

| May 23, 2013 01:09 am

जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘संगणक’ आवडे चोरांना

*      पुन्हा एकदा चार संगणकांची चोरी          
*      महत्त्वपूर्ण माहिती गायब
जिल्हाधिकारी कार्यालयातील महत्वपूर्ण विभागाच्या संगणकांवर पुन्हा एकदा चोरटय़ांची वक्रदृष्टी पडली असून मंगळवारी मध्यरात्री चार संगणक त्यांनी पुन्हा एकदा गायब केले आहेत. या कार्यालयातील संगणक चोरटय़ांना जणू इतके प्रिय असावे की, आसपास इतर महागडी यंत्रसामग्री असताना त्यांनी केवळ संगणक चोरण्यास पसंती दिल्याचे दिसते. जिल्हाधिकारी कार्यालयातून संगणक चोरीचे याआधी चार वेळा प्रकार घडले असताना आणि त्यात एकटय़ा नाशिक तहसीलदार विभागाचे संगणक तर तीन वेळा चोरीला गेले असूनही सुरक्षाव्यवस्थेच्या दृष्टीने यंत्रणेने कोणतीही खबरदारी घेतली नाही. या एकूणच प्रकाराबद्दल संशयही व्यक्त केला जात आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात जिल्हाधिकारी कार्यालयाची ब्रिटीशकालीन टुमदार इमारत आहे. या परिसराच्या सुरक्षाव्यवस्थेसाठी काही सुरक्षारक्षकही कार्यरत असतात. असे असताना चोरटय़ांनी प्रत्येकवेळी संगणकांवर हात मारण्याची संधी सोडलेली नाही. मंगळवारी मध्यरात्री चोरटय़ांनी पुन्हा तोच कित्ता गिरविला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या नाशिक तहसीलदार कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेचा फलक लावलेल्या खोलीत हा प्रकार घडला. या ठिकाणी रोजगार हमी योजना, पुरवठा व आस्थापना या तीन विभागांचे संगणकीय कामकाज चालते. या कार्यालयाचे टाळे तोडून तीन विभागांचे चार संगणक चोरटय़ांनी गायब केले. महत्वाची बाब म्हणजे, ज्या ठिकाणी हे संगणक होते, त्याच्या शेजारीच महागडी झेरॉक्स यंत्रणाही होती. परंतु, चोरटय़ांनी तिला हात न लावता संगणक नेणे पसंत केले. यापूर्वी या विभागातून तीन वेळा संगणक चोरीला गेलेले आहेत. गायब झालेल्या संगणकात रोजगार हमी योजना व आस्थापना विभागाची कार्यालयीन माहिती होती. पुरवठा विभागाचे संगणक काही दिवसांपूर्वीच कार्यान्वित करण्यात आल्यामुळे त्यात फारशी काही विशेष माहिती नसल्याचे तहसीलदार सुचेता भामरे यांनी सांगितले. वारंवार चोरीचे प्रकार घडत असूनही सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात निधीचा तुटवडा हे कारण पुढे केले जात आहे.
बुधवारी सकाळी हा प्रकार लक्षात आल्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढील बाजुस प्रखर दिव्यांचे प्रकाशझोत टाकून ब्रिटीशकालीन इमारत चकचकीत केली गेली असली तरी पाठीमागील बाजुस तुलनेत अंधारच असतो. याचाच फायदा चोरटे उचलतात. चोरीच्या या घटनेत चोरटय़ांचे लक्ष केवळ संगणकांकडे राहिल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे.

.. आता सीसी टीव्ही कॅमेरा
नाशिक तहसीलदार कार्यालयात सलग तीन वेळा संगणकांची चोरी झाल्यामुळे निधीअभावी रखडलेले सीसी टीव्ही बसविण्याची प्रक्रिया आता अधिकारी व कर्मचारी स्वनिधीद्वारे पूर्णत्वास नेणार आहे. याबाबतची माहिती तहसीलदार सुचेता भामरे यांनी दिली. गतवेळी संगणक चोरीचा प्रकार घडल्यानंतर सुरक्षिततेसाठी सीसी टीव्हीचा पर्याय पुढे आला होता. परंतु, निधीअभावी ती प्रक्रिया प्रत्यक्षात येऊ शकली नाही. चोरटय़ांनी पुन्हा एकदा संगणकांवर डल्ला मारल्याने शक्य तितक्या लवकर ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2013 1:09 am

Web Title: computer stolen from district officer office
Next Stories
1 बाळा नांदगावकरांच्या शुभेच्छांचे रहस्य
2 ‘बुलेट राजा’ मुळे अडचणीत स्थानिक ‘प्रजा’
3 अवैध धंद्यांविरोधातील आंदोलनाने राष्ट्रवादीत फूट
Just Now!
X