दीर्घ काळ रखडलेल्या बालिकाश्रम रस्त्याचे अत्याधुनिक पद्धतीने काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ सोमवारी आमदार अरुण जगताप यांच्या हस्ते झाला.
राज्याच्या सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून या रस्त्याचे काम सुरू आहे, मात्र ते दीर्घ काळ रेंगाळले. आता या कामाला वेग देण्यात येत आहे. जगताप म्हणाले, कामाच्या दर्जाबाबत महानगरपालिकेने कोणतीही तडजोड केलेली नाही. शहरात प्रथमच या पद्धतीने एखाद्या रस्त्याचे काँक्रिटीकरण होत असून ते अधिकाधिक काळ टिकावे अशा पद्धतीने हे काम करण्यात येत आहे. राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून शहरात विविध स्वरूपाची कामे सुरू असून ही कामे वेळेत पूर्ण व्हावी यासाठी मनपातील सत्ताधारी राष्ट्रवादी-काँग्रेसचा प्रयत्न आहे. बालिकाश्रम रस्त्याचे काम आता पूर्णत्वाकडे जात असून यश पॅलेस ते कोठी रस्त्याचे कामही प्रगतिपथावर आहे. बालिकाश्रम रस्त्याप्रमाणेच याही रस्त्याचे अत्याधुनिक पद्धतीने काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. तेही काम लवकरच पूर्ण होऊन हे दोन्ही महत्त्वाचे रस्ते शहरात खरे मॉडेल रस्ते म्हणून ओळखले जातील असा विश्वास जगताप यांनी या वेळी व्यक्त केला.
शहर अभियंता एन. बी. मगर यांनी या रस्त्याच्या कामाची तांत्रिक माहिती या वेळी दिली. नगरसेवक अभिषेक कळमकर, कुमार वाकळे, संपत बारस्कर, अनिल बोरुडे, उद्योजक शरद ठाणघे आदी या वेळी उपस्थित होते.