पाणीप्रश्नावर मराठवाडय़ाला सातत्याने दुय्यम वागणूक मिळत आहे. मराठवाडय़ाला हक्काचे पाणी देण्याबाबतही सरकारने नाकत्रेपणाची भूमिका घेतली. मराठवाडय़ावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी येथे रविवारी (दि. १९) पाणी परिषदेचे आयोजन केले आहे. शारदा महाविद्यालयात सकाळी १० वाजता ही परिषद होईल.
पश्चिम महाराष्ट्र, नगर, नाशिक भागातील नेत्यांकडून मराठवाडय़ास पाणी सोडण्याबाबत विनाकारण विरोध केला जात आहे. त्यामुळे मराठवाडय़ातील सिंचन क्षेत्राला मोठा फटका बसत आहे. या अन्यायाविरोधात लढा देण्यास, तसेच सरकारला निर्वाणीचा इशारा देण्याच्या दृष्टीने ही परिषद असल्याची माहिती संयोजक ज्येष्ठ पत्रकार हेमराज जैन यांनी दिली. मराठवाडय़ाच्या पाणीप्रश्नाविषयी आस्था असणाऱ्या सर्वानी या परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
अॅड. प्रदीप देशमुख, डॉ. सोमनाथ रोडे परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. के. के. पाटील व प्रा. डॉ. गोिवदराव नांदापूरकर यांचे मुख्य भाषण होणार आहे. माजी खासदार शेषराव देशमुख, माजी मंत्री सुरेश वरपुडकर, आमदार बाबाजानी दुर्राणी, संजय जाधव, मीरा रेंगे व रामप्रसाद बोर्डीकर, तुकाराम रेंगे, अॅड. प्रताप बांगर, स्वराजसिंह परिहार, अॅड. माधुरी क्षीरसागर, अशोक सोनी, डॉ. विवेक नावंदर आदी उपस्थित राहणार आहेत. परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन जैन, प्राचार्य शिवाजी दळणर, पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक कुटे आदींनी केले आहे.