राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथील शल्यचिकित्साशास्त्र विभागातर्फे १९ व २० जानेवारी रोजी पीजीकॉन या परिषदेचे आयोजन केले आहे. ही परिषद महाविद्यालयाच्या शेंडा पार्क येथील परिसरामध्ये होणार आहे. यामध्ये महाराष्ट्र, गोवा, व कर्नाटकातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील शल्यचिकित्सा विभागातील सुमारे २०० पदव्युत्तर विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉ.व्ही.ए.देशमुख व सहायक प्राध्यापक डॉ.शिवप्रसाद हिरूगडे यांनी दिली.
पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परिषद म्हणजे नवीन उपक्रम आहे. त्याचे उद्घाटन १९ जानेवारी अखिल भारतीय शल्यचिकित्साशास्त्र या संघटनेचे अध्यक्ष सुधाकर जाधव यांच्या हस्ते व राजर्षी शाहूमहाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता रघुजी थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेसाठी महाराष्ट्र व कर्नाटकातील नामवंत तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती डॉ.व्ही.ए.देशमुख व डॉ.शिवप्रसाद हिरूगडे यांनी दिली.