महाराष्ट्र सिंचन परिषद व सिंचन सहयोग, नांदेडच्या वतीने २१ व २२ जानेवारीला १५ वी महाराष्ट्र सिंचन परिषद आयोजित केली आहे. परिषदेची संकल्पना प्रसिद्ध जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांची असून, पाणलोट क्षेत्रातील सिंचन विस्तार हा परिषदेचा विषय आहे.
कुसुम सभागृह व यशवंत महाविद्यालय परिसरात होणाऱ्या या परिषदेत वरील विषयासह समांतर सत्रांचेही आयोजन केले आहे. सिंचन, कृषी, पाणी, पर्यावरण आदी विषयांवर यात सखोल चर्चा होणार आहे. डॉ. माधवराव चितळे, दि. मा. मोरे, आर. बी. घोटे, श्रीराम वरुडकर, प्रदीप पुरंदरे, या. रा. जाधव यांच्यासह पाणी व्यवस्थापनातील अधिकारी व अभ्यासक उपस्थित राहणार आहेत. परिषदेचे स्वागताध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आहेत. महिला, शेतकरी व विद्यार्थ्यांना परिषदेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. बाहेरून येणाऱ्या प्रतिनिधींसाठी नाममात्र शुल्क आकारून भोजन-निवास व्यवस्था करण्यात आल्याची माहिती अभियंता द. मा. रेड्डी यांनी दिली. परिषदेच्या निमित्ताने कृषी व जलप्रदर्शन भरविण्यात येणार आहे. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ या वेळी उत्कृष्ट शेतकऱ्यास २१ हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.