विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे १६ वे द्विवार्षिक महाअधिवेशन कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या भव्य पटांगणात येत्या रविवारी (दि. २०) आयोजित केले असून, सकाळी साडेअकरा वाजता पार पडणाऱ्या उद्घाटन सोहळय़ाच्या अध्यक्षस्थानी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय अध्यक्ष रामकिसन सोळंकी हे असणार आहेत. महाअधिवेशनाला सुमारे १५ हजारावर विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगारांची उपस्थिती राहील, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला आहे.  
उद्घाटन समारंभाला विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, वित्त व ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, कामगारमंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदामंत्री रामराजे निंबाळकर, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार विलासराव पाटील-उंडाळकर, बाळासाहेब पाटील, जयकुमार गोरे, ‘महापारेषण’चे व्यवस्थापकीय संचालक अरविंद सिंह, ‘महानिर्मिती’चे व्यवस्थापकीय संचालक आशिष शर्मा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. महाअधिवेशनाच्या निमित्ताने स्मरणिका २०१३, संघटनेची जन्मगाथा व  तांत्रिक रोजनिशीचे प्रकाशन होणार असून, अधिवेशन स्थळी   रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संघटनेचे सरचिटणीस रणजित देशमुख हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा विशेष गौरव मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे. तांत्रिक कामगारांच्या अडचणी व मागण्यांसंदर्भात ऊहापोह होणार आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या सत्रामध्ये ‘कामगारांचे प्रश्न व्यवस्थापनाची बाजू आणि जनतेच्या अडचणी’ यावर चर्चा होऊन मते मांडली जाणार आहेत. दुसऱ्या सत्रामध्ये पुढील वर्षांच्या वाटचालीचे ठराव केले जाणार आहेत. या वेळी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आवर्जून उपस्थित राहणार आहेत. महाअधिवेशनासाठी येथील शेतीउत्पन्न बाजर समितीच्या पटांगणात २२० बाय १८० चौरस फुटाचा भव्य सभामंडप, तेवढय़ाच आकाराचे भोजनगृह, शामियाना अशी व्यवस्था करण्यात आली आहे.