शहराच्या गुन्हेगारीत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार भाऊसाहेब कांबळे व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नागरिकांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनीता साळुंके-ठाकरे यांच्या कार्यालयावर जाऊन जाब विचारला, मात्र त्यामुळे उभयतांमध्ये चांगलीच शाब्दिक चमकमक उडाली. शहरात अनेक गुन्हे घडत असताना पोलिस बघ्याची भूमिका घेतात तसेच अवैध धंदेवाईकांना पाठीशी घालत सामान्य नागरिकांना त्रास दिला जात असल्याची तक्रार आंदोलकांनी केली. या वेळी ससाणे व ठाकरे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.
शहरामध्ये गेल्या चोवीस तासांत पाच ठिकाणी चो-या झाल्या. यापैकी एकही गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल नसल्याबाबत ससाणे यांनी उपाधीक्षक गांगुर्डे कधीच कुठे दिसत नाही. त्यांचे काही काम नाही, असे सांगत नाराजी व्यक्त केली. आ. कांबळे यांनी बस स्टँड परिसरात दिवसाढवळ्या लूटमारीचे प्रकार घडतात. लूटमार करणा-यांपैकीच काहीजण पीडितांना पोलीस ठाण्याचा रस्ता दाखवितात. पोलीस तपास करणा-यांऐवजी ज्याला लुटले त्याच्याकडेच पैशाची मागणी करतात, हे दुर्दैवी असल्याचे सांगून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.
नगरसेवक छल्लारे यांच्या माझ्या घरी झालेल्या चोरीत लाखोंचा ऐवज चोरी गेला, मात्र पोलिसांच्या सोयीसाठी कमी दाखविण्यात आल्याचा आरोप करीत रेल्वेखाली चिरडल्या गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांकडे पोलीस पैसे मागत असल्याचे सांगितले. प्रभाग दोनमधील रेल्वेलाईन परिसरात वाटसरूंना लुटण्याचे, मोबाईल चोरीचे प्रकार सर्रास सुरू आहेत, रस्त्यावर टोळीयुद्धाचे प्रकार, बंद घरांमध्ये चालणारे गुन्हेगारांचे अड्डे याबाबत तक्रारी करण्यात आल्या.
आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर गुन्हेगारीचा तक्ता समोर करत ठाकरे यांनी गुन्हेगारी कमी सांगत ही आकडेवारी सर्वासाठी खुली असल्याचे सांगितले. रस्त्यावरील गुन्हेगारी काही प्रमाणात वाढली. पोलीस भरती आणि नगरची अतिरिक्त जबाबदारी यामुळे माझे काही प्रमाणात इकडे लक्ष कमी झाले, अशी कबुली देत त्यांनी रात्री गस्तीदरम्यान झोपणा-या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करणार असल्याचे सांगितले. चोरीच्या प्रकरणांमध्ये पावती मागण्याची सक्ती करू नये, तक्रारींची दखल घ्यावी, याबाबत संबंधितांना सूचना देण्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. दरोडेखोर शंकर नेटके हा जामिनावर बाहेर असून त्याचीच टोळी सध्या चो-या करीत असल्याची आमची माहिती असल्याचे सांगत नेटकेच्या तडीपारीचा प्रस्ताव दिला असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. माझ्या कामाबाबत कुणी तक्रार करू शकत नाही, माझा नंबर चोवीस तास सर्वांसाठी खुला असल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर मोबाइल उचलत नसल्याच्या तक्रारी आंदोलकांनी केल्या.