परभणीत राष्ट्रवादीमध्ये कलहनाटय़
राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष विजय वरपुडकर यांनीे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांच्यावर जाहीर टीका करून राष्ट्रवादीत सर्व काही आलबेल चालले नसल्याचे दाखवून दिले. खुद्द पालकमंत्री प्रकाश सोळंके यांच्यासमोर हा कलह पुढे आल्याने नजीकच्या काळात राष्ट्रवादीतील संघर्षांची धार आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. या संघर्षांत माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर अजून पडद्यावर आले नसले, तरी भांबळे यांनी मात्र सध्या या संघर्षांत मौन बाळगणे पसंत केल्याचे दिसते.
गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीत अंतर्गत गटबाजी मोठय़ा प्रमाणावर उफाळली आहे. जाहीरपणे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले तरच ती गटबाजी दिसते. जनतेला या गटबाजीची माहिती होते, कोणीच कोणाविरुद्ध थेट बोलत नाही, याचा अर्थ सर्व काही ठीकठाक चालले आहे, असा होत नाही. बऱ्याचदा राजकारणातल्या घडामोडी पडद्यावर दिसण्यापेक्षा पडद्यामागेच वेगाने घडतात. राष्ट्रवादीतल्या सामान्य कार्यकर्त्यांला मात्र या सर्व उलथापालथी माहिती आहेत. गेल्या आठवडय़ात राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष विजय वरपुडकर यांच्या गटाने भांबळे यांच्यावर मनमानीचा आरोप केला, त्याची पेरणी तीन महिन्यांपासून तरी चालली आहे. लोकसभा निवडणूक हे या कलहाचे एक प्रमुख कारण आहे.
भांबळे लोकसभेचे उमेदवार म्हणून कामाला लागले होते. चार महिन्यांपूर्वी चारठाणा येथे त्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात पालकमंत्री सोळंके यांनी भांबळे यांनी जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काबीज करून लोकसभेत विजय मिळवून द्यावा, असे आवाहन केले. हा इतिहास ताजा असला तरी ही घटना व घडामोडींनी कमालीचा वेग घेतला. भांबळे यांचा लोकसभेच्या दिशेने उधळलेला वारू थांबविणे हा या मोहिमेचा पहिला भाग आहे.
लोकसभेसाठी भांबळे यांचे प्रयत्न चालले असतानाच राज्यमंत्री फौजिया खान यांचे नाव जाणीवपूर्वक पुढे आणले गेले. पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा कल खान यांना उमेदवारी देण्याकडे आहे. नेमकी हीच बाब माजी मंत्री वरपुडकर यांच्यासाठी फायद्याची ठरली आहे. भांबळे यांना थांबविण्यासाठी वरपुडकर यांनी चालून आलेल्या संधीचा खुबीने फायदा घेण्याचे ठरविलेले दिसते. परभणीत झालेल्या पवारांच्या कार्यक्रमानंतर आठवडय़ातून एक दिवस श्रीमती खान पक्ष कार्यालयात वेळ देणार, असे त्यांच्या वतीने जाहीर करण्यात आले. त्या पालकमंत्री होत्या, तेव्हाही आठवडय़ातला एक दिवस पक्षासाठी देण्याची त्यांची कल्पना नव्हती. मग आताच का हा निर्णय घेतला गेला? याचे कारण स्पष्ट आहे.
शालेय शिक्षण-आरोग्य-पोषण-जनजागरण मोहिमेच्या निमित्ताने त्यांचा जिल्ह्य़ातल्या वेगवेगळ्या भागात दौरा सुरूच आहे. संपूर्ण शासकीय यंत्रणा या मोहिमेत सहभागी आहे. एका अर्थाने ही लोकसभेचीही पूर्वतयारी आहे. याच मोहिमेच्या प्रबोधन शिबिराचा समारोप पवार यांच्या उपस्थितीत झाला. कार्यक्रमाची यजमान संस्था जिल्हा परिषद होती. जि. प. अध्यक्षपद भांबळे गटाकडे आहे. तरीही या कार्यक्रमात त्यांना पद्धतशीर बेदखल केले गेले. एकदा राजकारणाची दिशा बदलल्यानंतर काय होऊ शकते, याचे हे साधे उदाहरण. खान यांच्या उमेदवारीबाबत फैसला ठरायला अजून अवकाश असला, तरी भांबळे यांचा आत्मविश्वास खच्ची करण्यात वरपुडकरांना यश आले आहे. पक्षातल्या या वातावरणाचा परिणाम भांबळे यांच्या कार्यपद्धतीवरही झाला आहे. जिल्ह्य़ात लक्ष वाढवून पक्षकार्याचे दौरे वाढवले व उमेदवारीच मिळाली नाही तर काय करायचे, असा प्रश्न आता भांबळे यांच्यापुढेही आहे.
एकीकडे लोकसभेची तयारी चालविलेल्या भांबळे यांची पंखछाटणी पडद्याआड सुरू असताना आता थेट त्यांच्यावर टीका करण्याची दुसरी मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेचाही भांबळे यांना सामना करावा लागणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सुप्तपणे भांबळे यांच्याविरुद्ध पक्षात चाललेल्या मोहिमेला आता जाहीर तोंड फुटले आहे. भविष्यात राष्ट्रवादीतले राजकारण आणखी गतिमान होईल. नेमक्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विजय भांबळे यांना जिल्हाध्यक्षपदावरून हटविण्याची मागणी पुढे येणे हा योगायोग नाही. राष्ट्रवादीच्या माजी जिल्हाध्यक्षांचा विद्यमान जिल्हाध्यक्षांविरुद्ध सुरू असलेल्या संघर्षांत कार्यकर्ते मात्र भांबावले आहेत. भविष्यात हा संघर्ष कोणते वळण घेतो, या बाबत कमालीची उत्सुकता आहे.