लोकसभेच्या जागा वाटपांबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील तिढा सुटला असला तरी मतदारसंघ अदलाबदलीच्या चर्चेत यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचा वाद मात्र दोन्ही पक्षात कायम आहे. या मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीने आघाडी घेतल्याचा दावा करत हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा, अशी आमदार संदीप बाजोरिया, जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, सभापती सुभाष ठोकळ यांच्यासह दहावर ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे. मात्र, ही मागणी पूर्णत: गैर लागू आहे आणि कोणत्याही स्थितीत राष्ट्रवादीला हा मतदारसंघ सुटणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन ‘लोकसत्ता’जवळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केले आहे.
ठाकरे म्हणाले की, १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून तर लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना झाल्यानंतरही आणि यवतमाळ-वाशीम मतदारसंघाची नव्याने निर्मिती झाल्यावरही हा मतदारसंघ काँग्रेसकडेच होता, आहे आणि राहील. हिंगोली मतदारसंघ सध्या राष्ट्रवादीकडे आहे. तो काँग्रेसला देऊन यवतमाळ-वाशीम मतदारसंघात राष्ट्रवादीने दावेदारी सांगितली असल्याच्या चर्चेबाबत विचारले असता ते म्हणाले, अशी कोणतीही चर्चा पक्षाच्या समन्वय बैठकीत झालेली नाही. प्रसार माध्यमांमध्येच अशी चर्चा होत आहे. तिला कोणताच आधार नाही. यवतमाळ-वाशीममधून अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक यांनी पक्षाने आदेश दिल्यास आपण लढणार, असे शरद पवार यांना सांगितल्याचे राकाँच्या तरुण नेत्याने सांगितले. काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देशातील ज्या पंधरा लोकसभा मतदारसंघात प्रत्यक्ष कार्यकर्त्यांद्वारे उमेदवार निवडीचा प्रयोग जाहीर केला त्यात महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि यवतमाळ-वाशीम दोन मतदासंघाचा समावेश आहे. याचा अर्थच, काँग्रेस हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडणार नाही, हे स्पष्ट असल्याचे काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी लोकसत्ताला सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसला जर हा मतदारसंघ सुटला, तर मनोहर नाईक हे एकमेव नाव उमेदवारीसाठी आहे. काँग्रेसमध्ये मात्र सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके, माजी खासदार हरिभाऊ राठोड, माणिकराव ठाकरे यांचे सुपुत्र व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे, ह्रदयरोगतज्ज्ञ बंजारा समाजाचे नेते डॉ. टी.सी. राठोड यांची नावे चर्चेत आहेत. सेना-भाजप युतीतर्फे  खासदार भावना गवळी यांनाच सेनेची उमेदवारी मिळणार असल्याचे सेना आमदार संजय राठोड यांनी सांगितले असून खुद्द खासदार भावना गवळी यांनीही या वृत्ताला दुजोरा देऊन ‘लोकसत्ता’ला सांगितले की, मी तीन वेळा लागोपाठ खासदार म्हणून निवडून आली आहे. आता चौथ्यांदाही जनता मलाच लोकसभेत पाठवणार आहे. यवतमाळ-वाशीम मतदारसंघ काँग्रेसकडे राहतो की, राष्ट्रवादीला सुटतो इकडे मात्र महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.