जिल्हा परिषदेत शिवसेनेची सत्ता असून स्पष्ट बहुमत आहे. मात्र, जिल्हा परिषदेत अध्यक्ष व सभापतिपद निवडीबाबत सत्ताधारी गटात धुसफूस सुरू आहे. नाटय़गृह, व्यापारी संकुल बांधकामाच्या मुद्यावर खासदार सुभाष वानखेडे यांनी तोफ डागल्याने या कामांना स्थगिती दिल्याने वाद अधिक चिघळला. खासदार वानखेडे समर्थकांचा सभागृहात वेगळा गट स्थापण्याच्या हालचाली वेगाने सुरू झाल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषदेत ५०पैकी शिवसेनेचे २७ सदस्य आहेत. सभागृहात सेनेचे स्पष्ट बहुमत आहे. अध्यक्ष-सभापती निवडीपासून खासदार वानखेडे विरुद्ध माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, माजी आमदार गजानन घुगे यांच्यात दोन गट निर्माण झाले असून दुय्यम वागणूक मिळत असल्याचे खासदार समर्थक गटाचे म्हणणे आहे. दलितवस्ती सुधार निधीवाटप प्रकरणी तक्रारअर्जावर सहय़ा केल्याने सत्ताधारी गटातील गटबाजी उघड झाली.
खासदार सदस्यांना विश्वासात न घेता विरोधकांच्या सुरात सूर मिसळल्यामुळे सभागृहात वारंवार अडचणी वाढत गेल्याने बहुसंख्य बैठका, सभा वादळीच ठरल्या, तसेच बांधकाम मुद्यावरून संघर्ष पेटला आहे. खासदार वानखेडे यांनी लोकायुक्तांकडे तक्रारीचा इशारा देताच सत्ताधारी गट आक्रमक बनला. वानखेडे समर्थक १२ सदस्यांनी सभागृहात स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्याचे चित्र सोमवारी  पाहावयास मिळाले.