जिल्हा परिषदेच्या बैठकीत अशोक हरण व राजेश्वर पतंगे यांना पक्षविरोधी भूमिका घेतल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली. शिवसेनेच्या अंतर्गत कलहामुळे ही नोटीस दिल्याचे म्हटले जाते.
जिल्हा परिषदेमध्ये सेनेच्या सत्तास्थापनेपासून गटबाजीचे राजकारण सुरू आहे. अध्यक्ष निवडीनंतर मानपान व विषय समित्यांवरून सत्ताधाऱ्यांत बेबनाव सुरू आहे. त्यामुळे विषय समित्यांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला झुकते माप मिळाले. दलितवस्ती सुधार निधी वाटपात तक्रार झाली. त्यावर सत्ताधारी सदस्यांच्या सहय़ा असल्याने पालकमंत्र्यांनी स्थगिती दिली. एकूणच सत्ताधाऱ्यांत गटबाजी सुरू असल्याने विकासकामे थांबली असल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषदेतील गटनेते अनिल कदम यांनी खासदार वानखेडे समर्थक अशोक हरण व राजेश्वर पतंगे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. जिल्हा परिषदेच्या तीन सभांमध्ये पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला आहे.
 हे नगरसेवक आता काय भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष असून, सत्ताधारी शिवसेनेतील अंतर्गत कलह मात्र चव्हाटय़ावर आला आहे.