नाटय़ परिषदेतील घडामोडींनी अस्वस्थता
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद मुंबई शाखेतर्फे देण्यात येणारे पुरस्कार आणि जीवनगौरवचे मानकरी जाहीर झाल्यानंतर त्याचे श्रेय लाटण्यासाठी नागपूरच्या नाटय़ शाखेतील आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये चढाओढीचे नवीन नाटय़ सुरू झाले आहे. मानापमान आणि श्रेयाच्या नाटय़ाशी आपल्याला काहीही देणेघेणे नसल्याची प्रतिक्रिया नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी दिली असून स्वत:ला या नाटय़मय घडामोडींपासून अलिप्त ठेवणेच पसंत केले आहे.
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या मध्यवर्ती शाखेत नियामक मंडळाच्या कार्यकारिणीवर विदर्भातून प्रमोद भुसारी, किशोर आयलवार आणि दिलीप देवरणकर यांची निवड होऊन दोन महिन्याचा कालावधी झाला आहे. मध्यवर्ती शाखेतर्फे दरवर्षी राज्यातील विविध भागातील नाटय़ कलावंताना पुरस्कार देण्यासाठी विविध नाटय़ शाखांकडून नावे मागविण्यात आली होती. मात्र नागपूर शाखेतर्फे १९ मे पर्यंत एकही नाव पाठविण्यात आले नव्हते. त्यामुळे  कार्यकारिणीचे एक सदस्य दिलीप देवरणकर यांनी दिग्दर्शक संजय काशीकर, रंगभूषाकार बाबा खिरेकर आणि नाट्यलेखक उदयम ब्रम्ह यांच्या नावाची शिफारस केली. तिघांनाही दुसऱ्याच दिवशी पुरस्कार जाहीर झाले. प्रमोद भुसारी आणि किशोर आयलवार आपल्याला विश्वासात घेत नाहीत, असा आरोप करून देवरणकर यांनी आपणच वैयक्तिक पातळीवर मध्यवर्ती शाखेला पुरस्कार प्राप्त कलावंताची नावे पाठवल्याचे सांगितले.
या तीन पुरस्कारांचा वाद निवळत नाही तोच ज्येष्ठ नाटय़ कलावंत व दिग्दर्शक मदन गडकरी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला. गडकरी यांच्या रुपाने विदर्भाला प्रथ्मच हा सन्मान मिळाल्यामुळे त्यांचे श्रेय घेण्यासाठी परिषदेचे आजी माजी पदाधिकाऱ्यांचे राजकारण सुरू झाले आहे. मदन गडकरी यांच्या नावाची शिफारस आपणच केली असल्याचे परिषदेचे माजी पदाधिकारी दिलीप ठाणेकर यांनी सांगितले तर दुसरीकडे अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रमोद भुसारी, किशोर आयलवार आणि दिलीप देवरणकर या तिघांनीही पुरस्काराचे श्रेय घेतले आहे. श्रेयाच्या नव्या नाटकामुळे स्थानिक ज्येष्ठ नाटय़ कलावंतानी नाराजी व्यक्त केली. निवडणुकीच्या काळात नाटय़ परिषदेमध्ये काही कलावंतामध्ये असलेली नाराजी पुन्हा समोर येऊ लागली असून प्रमोद भुसारी आणि किशोर आयलवार यांच्या कार्यशैलीवर टीकेची झोड उठविण्यात आली आहे. दोघेही कोणालाच विश्वासात घेत नसल्याचा आरोप काही ज्येष्ठ सदस्यांनी केला आहे.
दिलीप देवरणकर यांनी यापूर्वीच भुसारी आणि आयलवार यांच्या कार्यशैलीवर उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर मुंबईच्या मध्यवर्ती शाखेत त्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळाली. या संदर्भात मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष आणि अभिनेते मोहन जोशी यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी या वादाशी आपला काही संबंध नाही आणि आपल्याला त्याची काही माहिती नसल्याचे सांगून विदर्भाच्या या नव्या नाटकापासून स्वतला दूर ठेवले.