डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरात अनधिकृत रिक्षा वाहनतळांची संख्या वाढत असल्याने वाहतूक कोंडीत मोठय़ा प्रमाणात भर पडत आहे. वाहतूक पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर, वाहतूक पोलिसां समक्ष हे अनधिकृत वाहनतळ सुरू केले जात आहेत. तरीही पोलीस या चालकांवर कारवाई करीत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरात सर्वाधिक वाहनांची वर्दळ असते. ही वाहने ये जा करण्यासाठी मोकळ्या रस्त्यांची गरज असते. पूर्व भागातील पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयासमोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनधिकृत रिक्षा वाहनतळ सुरू करण्यात आले आहेत. तीस ते पस्तीस फुटांच्या या रस्त्यावरील निम्मा भाग रिक्षांनी काबीज केला असल्याने या भागातून सकाळी, संध्याकाळी वाहनांची ने- आण करताना मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होते. पालिकेच्या प्रवेशद्वारातून वाहने काढताना, आत नेताना मोठी अडचण येते. या अनधिकृत वाहनतळांविषयी नागरिकांनी अनेक तक्रारी वाहतूक विभागाकडे केल्या आहेत. त्याची दखल घेण्यात येत नाही, असे नागरिकांकडून सांगण्यात येते. या दोन्ही बाजूंकडील रिक्षा वाहनतळांवरून गोळवली, सोनारपाडा, पिसवली, लोढा हेवन, काटई, निळजे, देसई या भागात रिक्षा जातात.
एक अनधिकृत वाहनतळ केळकर रस्त्यावर वाहतूक पोलीस कार्यालयापासून ५० फूट अंतरावर वृंदावन हॉटेलसमोर आहे. रस्त्यावर, वाहतूक पोलिसांसमक्ष हे रिक्षाचालक आडव्या तिडव्या रिक्षा उभ्या करून वाहतूक कोंडी करतात. त्यामुळे कोपर पुलावरून येणारी, रामनगरमधून येणाऱ्या वाहनांची वृंदावन हॉटेलसमोर मोठी गर्दी होते. केळकर रस्त्यावर पाटकर रस्ता दिशेने तीन ते चार रांगांमध्ये रिक्षा वाहनतळावर उभ्या असतात. हा रस्ता एकेरी वाहतुकीसाठी खुला आहे. मानपाडा रस्ता, कोपर पूल, भागातून सर्व खासगी वाहने केळकर रस्त्यावरून इंदिरा चौकातून पुढे जातात. केळकर रस्त्यावर रिक्षा वाहनतळ, रिक्षांचा थांबा आणि खासगी वाहनांची ये-जा त्यामुळे हा रस्ता सकाळी आठ ते रात्री अकरा वाजेपर्यंत वाहतुक कोंडीने भरलेला असतो. या रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी होत असताना वाहतूक पोलीस अधिसूचनेप्रमाणे ही वाहतूक होत आहे. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे काढलेली अधिसूचना बदलल्यानंतर वाहतुकीत बदल होतील, असे वाहतूक पोलिसांकडून बोलले जाते.  
बाजीप्रभू चौकात केडीएमटीचा बस थांबा, खासगी वाहने, कंपन्यांच्या बस, त्यात रिक्षा वाहनतळ, फेरीवाले असा चिवडा असल्याने या भागातून प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाला हातावर जीव घेऊन ये-जा करावी लागते. या चौकामध्ये कधीच वाहतूक पोलीस नसतो, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे एवढी बेशिस्त या भागात वाहतुकीच्या बाबतीत होत असते. डोंबिवली पश्चिमेत रिक्षा वाहनतळांमध्ये सुसूत्रता आहे. फक्त काही दादा रिक्षा चालक गेल्या महिन्यापासून पुन्हा विष्णुनगर पोलीस ठाणे बाजूकडील रेल्वे प्रवेशद्वारावर, स्वच्छता गृहाजवळ रिक्षा आडव्या लावून प्रवासी वाहतूक करीत आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना प्रवाशांना मोठी अडचण येते. तसेच महात्मा फुले रस्ता, महात्मा गांधी रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.