नवी मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे चार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे या दोन्ही पक्षांना शहरात चांगलेच खिंडार पडले असून भविष्यात राष्ट्रवादीतील अनेक नगरसेवक शिवसेना व भाजपच्या वाटेवर आहेत. माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भूमिकेवर राष्ट्रवादीतील नगरसेवकांची भूमिका ठरणार आहे. नाईक आपले राजकीय भवितव्य सोमवारी जाहीर करणार होते; पण राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनामुळे ही सभा रद्द करण्यात आली.
राष्ट्रवादीवर गेले वर्षभर नाराज असलेले कोपरखैरणे येथील शिवराम व त्यांची पत्नी अनिता पाटील या नगरसेवक दाम्पत्यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. पाटील यांनी गेल्या तीन निवडणुकांत अनेक कोलांटउडय़ा मारलेल्या आहेत. यापूर्वी ते शिवसेनेत गेले होते; पण काही अपेक्षा पूर्ण न झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तेथे पाच वर्षे वास्तव केल्यानंतर ते पुन्हा शिवसेनेत आले असून त्यापूर्वी ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. याशिवाय कोपरीतील काँग्रेसचे नगरसेवक विलास भोईर, रंगनाथ औटी, रामशेठ वाघमारे यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला असून पत्नी नगरसेविका असलेले अंकुश सोनावणे, शिक्षण मंडळ समिती सदस्य व काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते अरविंद नाईक यांनीही शिवसेनेची कास धरली आहे. यापूर्वी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव भगत, प्रकाश माटे, सुनील पाटील, सरस्वती पाटील यांनी पक्षबदल केलेला आहे. अशा प्रकारच्या अनेक उलथापालथी येत्या काळात होणार आहेत.