News Flash

‘एमआयएम’ व समाजवादी पक्षाच्या प्रवेशाने काँग्रेस-राष्ट्रवादी अडचणीत

महानगरपालीका निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस यासह शिवसेना, भाजप या प्रस्थापित पक्षांची चढाओढ सुरू असतानाच ओवेसी यांचा ‘एमआयएम’ आणि अबु आझमी यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षही

| November 22, 2013 08:38 am

महानगरपालीका निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस यासह शिवसेना, भाजप या प्रस्थापित पक्षांची चढाओढ सुरू असतानाच ओवेसी यांचा ‘एमआयएम’ आणि अबु आझमी यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. एमआयएमच्या पाच उमेदवारांनी भेटी घेऊन चाचपणी केली तर समाजवादी पार्टीने २५ जागा लढविण्याचे जाहीर केले आहे. यामुळे ज्या मतांवर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस संख्याबळात उजवे ठरतात, त्या पक्षांना या नव्या पक्षांकडून धोका संभवतो आहे.
शहरातील अल्पसंख्यांकबहुल भागात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना प्रतिसाद मिळतो हा आजवरचा इतिहास आहे. असे असताना काँग्रेस पक्षाला शहरात हवे तेवढे यश मिळवता आलेले नाही. उलटपक्षी काँग्रेसच्या विचारांशी साधम्र्य असलेल्या राष्ट्रवादी पक्षाने या भागात जनसंपर्क वाढवून आपली ताकद वाढविल्याचे अधोरेखीत झाले आहे. पण आजची परिस्थिती पाहता ओवेसी यांचा एमआयएम आणि समाजवादी पार्टी या दोन पक्षांनी धुळे शहरात उमेदवारी देण्याची रणनिती आखल्याने आता राष्ट्रवादी, काँग्रेस किंवा लोकसंग्राम या पक्षांना अल्पसंख्यांक भागातील मते सांभाळण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. अन्यथा राष्ट्रवादीतील काही मंडळी समाजवादी पार्टी किंवा एमआयएम सारख्या पक्षांकडे जाऊ शकते.
यापूर्वी असा फटका राष्ट्रवादीला बसलाच आहे. ज्या संख्या बळावर महापौर बसविण्याचा दावा राष्ट्रवादी पक्ष करीत होता, ते महापालिकेतले संख्याबळ अक्षरश: कुचकामी ठरले. राष्ट्रवादीच्या महापौरपदाच्या उमेदवार फुलाबाई भिल यांना भाजपने पळवून नेले आणि केवळ तीन संख्या बळ असलेल्या भाजपने महापौर म्हणून मंजुळा गावीत यांनी इतिहास घडविला. त्यावेळी महापालिकेतील दुसऱ्या क्रमांकाच्या शिवसेना या पक्षाकडे महापौरपदासाठी चुडामण मोरे हा एक उमेदवार होता. पण ऐनवेळी मोरे आश्चर्यकारकपणे धुळ्यातून गायब झाले. म्हणजे ज्या भाजपाचा विचार देखील महापौर पदासाठी कोणी केला नव्हता त्या पक्षाचा महापौर महापालिकेवर आरूढ झाला.
हा सगळा राजकीय इतिहास ताजा असताना धुळ्यात दाखल झालेला एमआयएम आणि समाजवादी पार्टी या पक्षांनी आपले अस्तित्व वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केले आहेत. अबु आझमी यांनी २५ उमेदवार देण्याचे जाहीर केले आहे. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आझमी यांनी काँग्रेसच्या डॉक्टर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. विपुल बाफना यांची भेट घेतली. यावेळी आझमी यांनी डॉ. बाफना यांच्या पत्नी डॉ. माधुरी बोरसे यांना धुळे लोकसभा मतदार संघातून समाजवादी पक्षातर्फे उमेदवारी देण्याचा प्रस्ताव ठेवला. डॉ. बोरसे या माजीमंत्री शालिनीताई बोरसे यांच्या कन्या आहे. समाजवादी पक्षाला हा लोकसभा मतदारसंघ कसा फायद्याचा ठरु शकतो, कोणाची मदत होवू शकते याबद्दल उभयतांमध्ये चर्चा झाली. समाजवादी पक्षाच्या प्रस्तावावर डॉ. बाफना यांनी होकार अथवा नकार दिला नसला तरी यामुळे समाजवादी पक्षाची रणनिती उघड झाली आहे. एमआयएम पक्षाने पाच उमेदवारांच्या भेटी घेतल्या आहेत. ऐनवेळी हे दोन्ही पक्ष निवडणुकीत सक्रिय झाल्यास मुस्लीमांची मते विभागली जातील हे वेगळे सांगायची गरज नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2013 8:38 am

Web Title: congress and ncp in conflict
टॅग : Congress,Ncp
Next Stories
1 मालेगाव तालुक्यात नदीजोड कालव्यांच्या कामांचे सर्वेक्षण
2 अमळनेर पालिका कर्मचाऱ्यांवर सीसीटीव्हीची नजर
3 मनमाड पालिकेची पाणीपट्टीत वाढ
Just Now!
X