युवक काँग्रेसच्यावतीने राज्यातील विविध मतदारसंघांतील सामाजिक प्रश्नांबाबत येत्या दोन महिन्यात मेळावे आयोजित करून हे प्रश्न शासनाकडे मांडण्यात येतील, असे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रदेश युवक काँग्रेसच्या विद्यमान कार्यकारिणीला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सध्या राज्यातील सर्व भागांचा दौरा सुरू असून विभागीय पातळीवर पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. गेल्या वर्षभरात संघटनेने अनेक कार्यक्रम हाती घेतले. लोकसभा आणि विधानसभा स्तरावर प्रशिक्षण देण्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून प्रयत्न करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून राज्यात युकाँचे सुमारे ४०० कार्यकर्ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत किमान १५ टक्के जागा युवक काँग्रेसकरता राखून ठेवाव्यात, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करण्यात येईल असे कदम म्हणाले. संघटनेत काही लोकांना ‘प्रमोशन’ देण्याबाबत विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
युकाँने राज्यात गेल्या वर्षभरात राबवलेल्या ‘चलो पंचायत’ अभियानात प्रत्येक गावापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगून कदम म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ सामान्य लोकांना मिळावा यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. यात संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना इ.ची माहिती देण्यात आली. यानंतर डिसेंबर व जानेवारी महिन्यात मोर्चे, मेळावे या माध्यमातून लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातील सामाजिक प्रश्न शासन आणि लोकप्रतिनिधींकडे मांडण्यात येतील. नुकतेच १८ ते २५ वर्षे वयोगटातील युवतींचे संमेलन सोलापूर येथे आयोजित करण्यात आले होते. दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या सदस्यता मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून सुमारे ३० हजार जण युकाँचे सदस्य झाले आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.
नागपुरातील युवक काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी एका पोलीस शिपायाला तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांला मारहाण केली, याकडे लक्ष वेधले असता, या प्रकाराची लोकसभा निरीक्षकांमार्फत चौकशी करण्यात येईल असे कदम यांनी सांगितले. संघटनेत अशी प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही आणि संबंधित पदाधिकारी दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल अशी हमी त्यांनी दिली.
जनतेपर्यंत पोहचण्याचा भाग म्हणून आदिवासी, मागासवर्गीय आणि महिला यांचे मेळावे राज्यभरात आयोजित करण्यात येणार असल्याचे संघटनेचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे जानेवारी महिन्यात युवकांच्या प्रश्नांबाबत विविध भागात पदयात्राही आयोजित केल्या जातील. विभागीय पातळीवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये पदाधिकाऱ्यांनी लोकांचे रस्ते, वीज व शेतीला पाण्याचे प्रश्न मांडले आहेत. गेल्या १० वर्षांत राज्यात रोजगारनिर्मिती कमी झालेली असल्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा मुद्दाही उचलला जाईल. युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाऐवजी युवक कल्याणासाठी वेगळे मंत्रालय स्थापन केले जावे, अशी मागणी संघटनेचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली. युवक काँग्रेसचे अ.भा.सचिव हिंमतसिंग, नागपूर लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष समीर मेघे, राहुल पुगलिया प्रभृती यावेळी उपस्थित होते.