जिल्हय़ातील पाटोदा-शिरूर बाजार समिती संचालक मंडळाच्या १३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे मंत्री सुरेश धस यांच्या नेतृत्वाखालील भाजप, काँग्रेस या सर्वपक्षीय महायुतीचे सर्व उमेदवार २००पेक्षा जास्त मतांच्या फरकाने विजयी झाले. जिल्हय़ाच्या राजकारणात परस्परांचे आम्हीच विरोधक, असा डांगोरा पिटणारे बाजार समिती निवडणुकीत मात्र जागा वाटून घेऊन एकत्र लढले.
शिरूर पाटोदा बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी रविवारी (दि. ८) मतदान झाले. आष्टी मतदारसंघातील ही बाजार समिती वर्षांनुवष्रे काँग्रेसचे रामकृष्ण बांगर यांच्या ताब्यात आहे. राष्ट्रवादीचे राज्यमंत्री सुरेश धस यांनी ही समिती ताब्यात घेण्यासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राजकीय खेळी खेळली. त्यात काँग्रेस, भाजप व स्थानिक संघटनाही एकत्र आल्या. सुरुवातीला राष्ट्रवादीला ९, भाजपला ५, काँग्रेसला ४ अशी जागांची वाटणी झाली होती. त्यातून ५ जागा बिनविरोधही झाल्या, मात्र जिल्हय़ाच्या राजकारणात परस्परांचे विरोधक म्हणून डांगोरा पिटणारे सर्वच नेते एकत्र आल्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांनी बाजार समिती बचाव पॅनल करून निवडणूकलढवली. उर्वरित १३ जागांसाठी रविवारी मतदान झाले. सोमवारी मतमोजणी झाली. यात महायुतीचे सर्वच उमेदवार २००पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आले. सेवा सहकारी सोसायटीमध्ये सर्वसाधारणमधून महायुतीच्या सोजरबाई बाबासाहेब कणुजे व अयोध्या शिवनाथ पवार या दोघी बिनविरोध निवडून आल्या.
वैजनाथ मिसाळ, रामकृष्ण बांगर, प्रल्हाद धनगुडे, दशरथ वनवे, तात्याराम हुले, अंकुश मुंडे, भगवान सानप, एनटीमधून सुरेश राख, बळीराम शेलार, श्रीहरि गिते, उमरबिन मकराणी, अनुराधा जावळे व मीराबाई ढाकणे विजयी झाले. विजय बांगर, कल्याण भोसले व नवनाथ कंठाळे हे तिघे बिनविरोध निवडून आले होते. महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आल्याने महायुती समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष साजरा केला.