जेमतेम एखाददुसरा नगरसेवक गाठीशी असताना ठाणे शहर मतदारसंघातून सर्वात आधी उमेदवार जाहीर करून काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसचे या भागातील नेते वसंत डावखरे यांची डोकेदुखी वाढवली असून शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघात मतांचे विभाजन टाळण्यासाठी सर्वपक्षीय समन्वयाचे राजकारण करण्याचे बेत आखणारे डावखरे यांचे मनसुबे काँग्रेसच्या ‘नारायणास्त्रा’मुळे सध्या तरी धुळीस मिळाल्याचे चित्र आहे. काँग्रेस आघाडीची चर्चा सुरू असताना डावखरे यांच्यासाठी ठाणे शहर मतदारसंघाचा आग्रह राष्ट्रवादीने धरला होता. आघाडी झाली नाही तरीही सर्वपक्षीय सलोख्याच्या बळावर शिवसेनेला एकपक्षीय आव्हान उभे करता येईल का, याची चाचपणीही डावखरे यांच्या गोटातून सुरू होती. असे असताना काँग्रेसने आघाडी तुटण्यापूर्वीच आपल्या पहिल्या यादीत येथून उमेदवार जाहीर करून राष्ट्रवादीला कात्रजचा घाट दाखविला असून ठाण्यातील बहुचर्चित समन्वयाच्या राजकारणाला त्यामुळे तडा गेला आहे.
काँग्रेस आघाडीच्या राजकारणात ठाणे शहर हा प्रतिष्ठेचा मतदारसंघ सुरुवातीपासून काँग्रेसकडे होता. या मतदारसंघात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचे नगरसेवक मोठय़ा संख्येने निवडून येत असतात. त्यामुळे आघाडीच्या बोलणीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा यासाठी डावखरे पिता-पुत्रांनी जोरदार प्रयत्न सुरू केले होते. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच डावखरे कुटुंबाने वेगवेगळ्या कामांचा धडाका शहरात लावला होता. त्यामुळे डावखरे लढणार हे तर पक्के मानले जात होते. आघाडीची बोलणी फिसकटू लागल्यानंतरही या मतदारसंघात ‘समन्वया’चा राजकारणाचा फॉम्र्युला राबविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. काँग्रेसचे या मतदारसंघात जेमतेम तीन नगरसेवक निवडून आले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुभाष कानडे यांनी चांगली मते घेतली, मात्र राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार देवराम भोईर यांना मिळालेल्या मतांचा आकडा लक्षणीय होता. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या या मतदारसंघात एकपक्षीय उमेदवाराचा ‘प्रयोग’ करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीच्या गोटात सुरू होते.
पवारांच्या उमेदवारीने गणित चुकले
असे असताना काँग्रेसने आपल्या पहिल्याच यादीत पाचपाखाडी येथील पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांचे नाव जाहीर करून डावखरे यांचे ‘गणित’ चुकविल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात रंगली आहे. नौपाडा, पाचपाखाडी या परिसरांत काँग्रेसचे अस्तित्व केवळ नावापुरते आहे. नारायण पवार हे पक्षाचे एकमेव नगरसेवक शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यातून सातत्याने निवडून येतात. पवार यांच्यासह मेघना हंडोरे आणि जयनाथ पुर्णेकर असे पक्षाचे आणखी दोन नगरसेवक या मतदारसंघात आहेत. त्यामुळे राबोडीसारखा मुस्लीमबहुल तसेच मानपाडा, ढोकाळीसारख्या उत्तर भारतीयांचे प्रमाण अधिक असलेल्या परिसरांत मतांचे विभाजन होऊ नये यासाठी राष्ट्रवादीची धडपड सुरू होती, मात्र पवार यांच्या उमेदवारीमुळे डावखरे यांच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला असून मुस्लीमबहुल वस्त्यांमधील मतांचे विभाजन टाळण्याचे मोठे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. यासंबंधी राष्ट्रवादीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, आघाडी-युती नसल्यामुळे आता सर्वच उमेदवारांना स्वबळावर लढावे लागणार असल्यामुळे पक्षाने माझी उमेदवारी जाहीर केल्याचे सांगितले. एकपक्षीय उमेदवाराचा असा कोणताही फॉम्र्युला नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.