दिंडोरी लोकसभा मतदारसंघातंर्गत येणाऱ्या नांदगाव विधानसभा मतदारसंघात विकास कार्ड निष्प्रभ ठरले. मतदारांना प्रत्येक वेळी गृहीत धरून राजकारण करण्याचा डाव राष्ट्रवादीच्या चांगलाच अंगलट आल्यामुळे आता नांदगाव विधानसभा मतदारसंघाची जागा राखणे राष्ट्रवादीसाठी आव्हानात्मक झाले आहे. तर, काँग्रेसची अवस्था एखाद्या जीर्ण वस्त्रासारखी किंवा जुनाट वाडय़ासारखी झाली आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या काँग्रेसमध्ये रोडावली असली तरी माजी आमदार अनिल आहेर यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषद सभापती सुनिता आहेर तसेच विलास आहेर यांच्याकडून विधानसभेसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली जाण्याची शक्यता आहे. महायुतीकडे यावेळी इच्छुकांची संख्या प्रचंड राहणार असून नाशिकमध्ये वादग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केलेल्या सुहास कांदेनेही उमेदवारीसाठी जोरदार तयारी सुरू केल्याने इतर इच्छुकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
छगन भुजबळ हे जर नाशिकमध्ये पराभूत होऊ शकतात. तर, पंकज भुजबळ यांचा पराभव करणे अशक्य नाही. असा आत्मविश्वास आल्यामुळे नांदगाव व येवल्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. या दोन्ही ठिकणी ६० ते ६५ हजार मतांची आघाडी मिळविल्याने राष्ट्रवादी चांगलीच अडचणीत आली आहे. येवला तसेच नांदगावमध्ये प्रवेश केल्यानंतर भुजबळ कुटूंबियांनी प्रथम स्थानिक नेत्यांची मोट बांधून स्वत:चे स्थान बळकट केले. विरोधकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या तंबूत खेचले. त्यामुळे मतदारसंघात प्रबळ विरोधकच शिल्लक राहणार नाही. हे त्यांनी पाहिले. परंतु लोकसभा निवडणुकीत आलेल्या मोदी लाटेने भुजबळांना नाशिकसह नांदगाव व येवला या विधानसभा मतदारसंघांमध्येही चांगलाच दणका दिला. त्यांच्या पराभवामुळे राष्ट्रवादीसह भाजप व शिवसेनेतील अनेकांच्या महत्वाकांक्षांना धुमारे फुटले आहेत. त्यामुळे भुजबळांना कधी नव्हे ते पक्षांतर्गत मोठे आव्हान मिळण्याची चिन्हे आहेत.
नांदगावची जागा पूर्वी काँग्रेसकडे होती. २००४ मध्ये काँग्रेसचे अनिल आहेर यांचा पराभव करून शिवसेनेचे संजय पवार आमदार झाले. २००९ मध्ये छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज यांनी पवार यांचा पराभव केला. काही दिवसांनी संजय पवार स्वत: भुजबळांच्या तंबूत जाऊन विसावले. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने पुन्हा नांदगावच्या जागेवर हक्क सांगण्यास सुरूवात केला आहे. ही जागा आपल्याला मिळावी असा दावा अनिल आहेर समर्थकांनी केला आहे. त्यातच नांदगावातून महायुतीला ६५ हजार मतांची आघाडी मिळाली असल्याने आ. पंकज भुजबळ यांच्यासमोरील अडचणींमध्ये अधिकच भर पडली आहे. येवला व नांदगावात धडकलेली मोदी लाट विधानसभा निवडणुकींच्या वेळी कशी थोपवायची याचे आव्हान भुजबळ पिता-पुत्रांसमोर उभे आहे.
लोकसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी वाढल्याने भाजपानेही आता नांदगाव विधानसभेच्या जागेवर हक्क सांगण्यास सुरूवातो केली आहे. तालुक्यात भाजपची ताकद वाढल्याची जाणीव मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला करून देण्यासाठी भाजपच्या राज्य कार्यकारिणी सदस्या जयश्री दौंड यांनी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप लहान भावाच्या भूमिकेत होता. मात्र आता मोदी लाटेमुळे व वाढलेल्या जनाधारावर भाजपने नांदगावच्या जागेवर हक्क सांगण्यास सुरूवात केली आहे. दरवेळी शिवसेनेची मनमानी चालते. परंतु आता उघडपणे भाजपने दावा केल्याने नांदगाव तसेच येवला मतदारसंघातही महायुतीत इच्छुकांची संख्या वाढून उमेदवारीबाबत मोठा पेच निर्माण होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.