इतर मागास प्रवर्गाचा खोटा आणि बनावट दाखला सादर करून सोलापूर महापालिकेची निवडणूक लढविलेले काँग्रेसचे नगरसेवक नागेश ताकमोगे यांचे नगरसेवकपद राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी अपात्र ठरविले आहे. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेसला झटका बसला आहे.
दक्षिण सोलापूरचे काँग्रेसचे आमदार दिलीप माने यांचे समर्थक समजले जाणारे नगरसेवक नागेश लक्ष्मण ताकमोगे हे फेब्रुवारी २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्र. ४९ अ मधून निवडून आले होते. इतर मागास प्रवर्गासाठी असलेल्या या प्रभागातून निवडणूक लढविताना ताकमोगे यांनी कुणबी जातीचा खोटा आणि बनावट दाखला तथा जात वैधता प्रमाणपत्र सादर केले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ताकमोगे यांच्याविरुध्द यापूर्वीच फौजदारी कारवाई करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयातही हे प्रकरण गेले होते.
दरम्यान खोटा जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढविल्याने निवडणूक अधिनियमातील तरतुदीनुसार ताकमोगे हे निवडणूक लढविलेल्या काळापासून म्हणजेच फेब्रुवारी २०१२ पासून अपात्र ठरतात. त्यामुळे राज्य निवडणूक आयुक्तांच्या १७ ऑगस्ट २०१३ च्या पत्रानुसार पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी नगरसेवक ताकमोगे यांना अपात्र ठरविले आहे. त्यामुळे प्रभाग क्र. ४९ अ ची जागा रिक्त झाली आहे. या प्रभागासाठी पोटनिवडणूक घेण्याची प्रक्रिया राबविण्यातबाबत सोलापूर महापालिकेकडून राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र पाठविण्यात आले आहे. यापूर्वी भाजपचे नगरसेवक अनंत जाधव (प्रभाग क्र. ७ अ) यांना एका खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्दबातल ठरविण्यात आले होते. त्यानंतर आता काँग्रेसचे ताकमोगे यांचेही नगरसेवकपद अपात्र ठरविण्यात आले आहे.