नागरिकांच्या मागणीनुसार अवघ्या १० महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या तब्बल ३५ हजार कचराकुंडय़ांचे वाटप करण्यात आले असून आता आणखी कचराकुंडय़ा खरेदी करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. मात्र मागणी करूनही प्रशासनाने आजतागायत कचराकुंडी उपलब्ध केलेली नाही. मग या ३५ हजार कचराकुंडय़ा गेल्या कुठे असा सवाल नगरसेवकांकडून  करण्यात येत आहे.
ठिकठिकाणी रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचू लागल्यामुळे तब्बल ३५ हजार कचराकुंडय़ा खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी तब्बल ३५ हजार छोटय़ा कचराकुंडय़ा खरेदीचा प्रस्ताव प्रशासनाने मे २०१४ मध्ये स्थायी समितीच्या बैठकीत सादर केला होता. मुंबईकरांच्या आरोग्यचा प्रश्न लक्षात घेऊन स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि त्यानंतर ३५ हजार छोटय़ा कचराकुंडय़ा खरेदी करण्यात आल्या. आता प्रशासनाने आणखी काही कचराकुंडय़ा खरेदी करण्याचा निर्णय घेऊन निविदा मागविल्या आहेत.
प्रशासनाने खरेदी केलेल्यांपैकी एकही कचराकुंडी आपल्याला मिळालेली नाही. या ३५ हजार कचराकुंडय़ा गेल्या कुठे, असा प्रश्न काँग्रेस नगरसेवक प्रवीण छेडा यांनी उपस्थित केला आहे. या कचराकुंडय़ा कोणत्या प्रभागांमध्ये वितरित केल्या याची माहिती सादर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.