कॉंग्रेस नगरसेवकाने पक्षाचे मेळावे आयोजित करण्याचे सोडून पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता मेळावा घेऊन माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा भव्य नागरी सत्कार केला. विशेष म्हणजे, पीरिपाच्या या मेळाव्यात स्वत:ला निष्ठावंत कॉंग्रेसी म्हणवून घेणाऱ्या नगरसेवकांनी स्वत:चा सत्कार घडवून आणला. या सत्काराची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे.
 प्रा.जोगेंद्र कवाडे यांचे खंदे समर्थक व कॉंग्रेसचे नगरसेवक अनिल रामटेके यांनी स्वत: पुढाकार घेऊन पीपल्य रिपब्लिकन पार्टीचा कार्यकर्ता मेळावा येथे आयोजित केला. महापालिका निवडणुकीत रामटेके कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडून आले असले तरी ते मनाने अजूनही पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे खंदे कार्यकर्ते आहेत. यातूनच त्यांनी या मेळाव्याचे भव्य आयोजन केले. या निमित्ताने त्यांनी शहरातील प्रतिष्ठितांकडून निधी संकलन केले. आपल्या खंद्या समर्थकाने मेळाव्याचे आयोजन केल्याने या कार्यक्रमाला माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे आवर्जून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी पीरिपाचे जिल्हाध्यक्ष हरिश दुर्योधन होते. प्रमुख अतिथी म्हणून थॉमस कांबळे, पुरुषोत्तम पाटील, जयदीप कवाडे, कॉंग्रेसचे मनपा सभापती अनिल रामटेके यांची उपस्थिती होती. अतिशय गाजावाजा करून आयोजित केलेल्या या कार्यकर्ता मेळाव्यात पीरिपाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्याऐवजी कॉंग्रेस नगरसेवक प्रवीण पडवेकर, करिमलाला काझी या कॉंग्रेस नगरसेवकांचा प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या मेळाव्यात मुख्य सत्कारमूर्ती स्वत: अनिल रामटेके होते. कार्यक्रम पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा, मुख्य आयोजक आणि सत्कारमूर्ती कॉंग्रेस नगरसेवक असल्याने राजकीय वर्तुळात या सत्काराची चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, पीरिपाचा मेळाव्यात कॉंग्रेस नगरसेवकांच्या सत्काराने पक्षातील काही निष्ठावंत रामटेके यांच्यावर नाराज झाले. त्यांनी ही नाराजी बोलूनही दाखविली, मात्र राजकारणात हे सर्व करावेच लागते, असे म्हणून कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात आली. या मेळाव्यासाठी पीरिपाचे अशुल भसारकर, राजकुमार कातकर, सचिन फुलझेले, तेजराज मानकर, सचिन मानकर, मोरेश्वर घोडमारे, अनिल खोब्रागडे, अनिल रामटेके, किरण रामटेके, रवी गणवीर, संतोष रामटेके, आकाश रामटेके, धम्मदीप टेभुर्णे, पोखराज खरे यांनी परिश्रम घेतले.