परतूरचे अपक्ष आमदार सुरेशकुमार जेथलिया यांच्या काँग्रेस प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. येत्या १५ ऑक्टोबर रोजी परतूर येथे मुख्यमंत्री आणि प्रवेश काँग्रेस अध्यक्षांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
प्रदेश काँग्रेसच्या वतीने आयोजित जिल्हय़ातील वचनपूर्ती जनजागरण यात्रेचा शुभारंभ शनिवारी (२८ सप्टेंबर) भोकरदन येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्या वेळी आमदार जेथलिया पक्षाच्या व्यासपीठावर होते. या वेळी आमदार जेथलिया यांच्या पक्षप्रवेशासाठी आगामी १५ ऑक्टोबर ही तारीख निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले.
आमदार जेथलिया हे मूळ काँग्रेस पक्षातीलच आहेत. १९९१मध्ये ते प्रथम परतूरच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसकडूनच निवडून आले होते. जवळपास दहा वर्षे ते काँग्रेसकडूनच नगराध्यक्ष होते. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून त्या पक्षाकडून विधान परिषदेचे सदस्यत्व मिळविले होते. मागील विधानसभा निवडणुकीत ते परतूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले होते.
अपक्ष आमदार म्हणून त्यांनी प्रारंभीच राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीस पाठिंबा दिला होता. मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आपण ही भूमिका घेतल्याचे त्यांनी त्या वेळी स्पष्ट केले होते. जेथलिया काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे संकेत यापूर्वीच मिळाले होते. आघाडीत परतूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत परतूरमध्ये ते काँग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.