रामटेक लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस व शिवेसनेला अस्तित्वासाठी धडपड करावी लागत असतानाच भाजपला मात्र विजयाची खात्री वाटत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीही कंबर कसून मैदानात असल्याने भाजप, सेनेचे मनसुबे पूर्ण होईल का, याचे उत्तर येणारी वेळच सांगणार आहे.  
गेल्या विधानसभा निवडणुकीत सहापैकी चार मतदारसंघात युतीचे उमेदवार निवडून आले होते. गेल्यावेळी काटोल राष्ट्रवादीने तर सावनेर काँग्रेसने आपल्या ताब्यात खेचून आणले. उर्वरित चारपैकी तीनवर भाजप आणि एका ठिकाणी सेनेला विजय संपादन करता आला. किमान या जागा तरी आपल्या ताब्यात राहाव्यात यासाठी विद्यमान आमदार व त्यांचे पक्ष कंबर कसून आहेत. चार महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभेतील पराभवानंतरही काँग्रेसमधील लाथाडय़ा कमी झालेल्या नाहीत. त्याचा फटका पुन्हा काँग्रेसला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेचे आमदार आशिष जयस्वाल यांनी पाच वर्षांपूर्वी काँग्रेसचे सुबोध मोहिते यांचा ३ हजार ३६१ मतांनी पराभव केला होता. यावेळी बाहेरचा उमेदवार नको, अशी भूमिका काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतली असतानासुद्धा पुन्हा काँग्रेसने सुबोध मोहिते यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेसचा एक गट प्रचंड नाराज आहे. दुसरीकडे भाजपने मल्लीकार्जून रेड्डी यांना उमेदवारी देऊन शिवसेनेला थेट आव्हान देऊन या क्षेत्रातील आदिवासी मतदारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या येथे चौरंगी लढती होत असल्या तरी भाजपचे रेड्डी आणि राष्ट्रवादीचे डॉ. अमोल देशमुख यांच्यातच तुल्यबळ लढत होत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या निवडणुकीत फक्त ३ हजार मतांनी निवडून आलेल्या सुनील केदार यांच्यासाठी यावेळची निवडणूक धोक्याची ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भाजपचे सोनबा मुसळे यांचा अर्ज रद्दबातल ठरवल्याने या मतदारसंघात भाजपचा उमेदवार नाही. त्यामुळे भाजपपुढे कुणाला पाठिंबा द्यावा, असा पेच पडला आहे. भाजपची मते सेनेचे जीवतोडे गुरुजी यांच्याकडे जाईल, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. त्यामुळे सध्या तरी काँग्रेसचे केदार आणि सेनेचे विनोद जीवतोडे यांच्यातच लढत होत आहे. जातीय समीकरणावर आधारीत मतदान झाल्यास जीवतोडे गुरुजी यांचे नशीब पालटू शकते. राष्ट्रवादीचे किशोर चौधरी जेवढी मते घेतील, तेवढाच लाभ जीवतोडे यांना होऊ शकतो.
चार महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला काटोल मतदारसंघातून तब्बल ३८ हजार ४४६ मताधिक्य मिळाल्याने राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यांच्या विरोधात त्यांचेच पुतणे आशिष देशमुख भाजपतर्फे लढत देत आहेत. गेल्या २० वर्षांत अनिल देशमुख यांनी काहीच कामे केले नसल्याचा आरोप भाजपकडून होत आहे. तर ते कामाची जंत्री वाचून दखवत आहेत. शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाव काटोल शहराच्या बाहेर दिसून येत नाही. तसेच शिवसेनेचे हरणे यांनाही काही मर्यादा आहेत. त्यामुळे येथे खरी लढत काका पुतण्यामध्येच होत असल्याचे दिसून येत आहे.
कामठीचे विद्यमान भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे हेच यावेळीसुद्धा बाजी मारणार, असेच चित्र सध्यातरी दिसून येत आहे. कारण त्यांच्या विरोधात असलेले काँग्रेसचे राजेंद्र मुळक यांच्याकडे येथील मतदार बाहेरचे म्हणून बघत आहेत. त्यातच बावनकुळे यांनी गेल्या पाच वर्षांत विरोधी पक्षात असतानासुद्धा मतदारांशी नाळ तोडली नाही. अनेक विकासाची कामे केलीत. त्यामुळे त्यांच्याविषयी मतदारांमध्ये आपुलकी दिसून येत आहे. त्यातच ऐकेकाळच्या त्यांच्या विरोधक बरिएमंचच्या माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांनी पाठिंबा दिल्याने बावनकुळे यांची स्थिती मजबूत झाली आहे. शिवसेनेचे तापेश्वर वैद्य भाजपच्या मताला फारसे खिंडार पाडणार नाहीत, असे बोलले जात आहे.
हिंगणा मतदारसंघात राष्ट्रवादीचे रमेश बंग आणि भाजपचे समीर मेघे यांच्यातच तुल्यबळ लढत होत असल्याचे दिसून येत आहे. सेनेचे प्रकाश जाधव आणि काँग्रेसच्या कुंदा राऊत या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मागे पडल्याचे दिसून येत आहे. गेल्यावेळी पराभूत झाल्यानंतरही रमेश बंग यांनी मतदारांशी सतत संपर्क ठेवला. त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या भागातील मतदार यावेळी बंग यांच्याकडे आकर्षित होत आहे. दुसरीकडे समीर मेघे आणि प्रकाश जाधव यांच्याकडे बाहेरचे उमेदवार म्हणून बघितले जात आहे. त्यातच युतीच्या मतदानाच्या विभाजनाचा फटका बंगच्या पथ्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विद्यमान भाजपचे आमदार सुधीर पारवे यांच्याविषयी सध्या पक्षातच नाराजी दिसून येत आहे. या भागातील अपक्ष म्हणून उमेदवार राजू पारवे आणि सेनेचे ज.मो. अभ्यंकर हे सुधीर पारवे यांच्या तोंडाला फेस आणत आहे. बसपाचे रुक्षदास बन्सोड आणि राष्ट्रवादीचे रमेश फुले यांची उमेदवारीसुद्धा लक्षवेधक ठरत आहे.