अन्न सुरक्षा विधेयकासह काँग्रेसप्रणीत केंद्र सरकारने जाहीर केलेल्या विविध योजना या केवळ २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांना दाखविलेले प्रलोभन आहे. केंद्र सरकारच्या सध्याच्या धोरणामुळे हा देश लुळापांगळा होणार असून शेतकरी व आम आदमीचे काही भले होणार नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे देशभरातील शेतकरी व आम आदमीने या प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन शेतकरी संघटनेचे प्रणेते व माजी खासदार शरद जोशी यांनी केले.
चांदा क्लब ग्राउंडवर आयोजित शेतकरी संघटना व शेतकरी महिला आघाडीच्या बाराव्या राष्ट्रीय संयुक्त अधिवेशनाचे उद्घाटन शरद जोशी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष शेतकरी संघटनेचे नेते व माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, प्रमुख अतिथी म्हणून पीटीआयचे माजी अध्यक्ष वेदप्रकाश वैदिक, लोकसत्ता पार्टीचे आमदार जयप्रकाश नारायण, माजी खासदार, अखिल भारतीय किसान समन्वय समितीचे अध्यक्ष सरदार भूपेंद्रसिंग मान, डॉ. मानवेंद्र काचोळे, रवी देवांग, संजय कोले, सरोज काशीकर, शैलजा देशपांडे, गुणवंत पाटील हंगर्णेकर, अनिल धनवट, राम नेवले, गोविंद जोशी, तुकाराम निरगुडे, भास्कर बोरावळे, ब. ल. तामस्कर, जगदीश बोंडे, अनंत उमरोकर, अन्नाजी राजेधर, बद्रिनाथ देवकर, अरुण केदार, सिंधू बारसिंगे, प्रभाकर ढवस, प्रल्हाद पवार, प्रा. अनिल ठाकूरवार, नीळकंठ पवार, अरुण नेवले, विजय निरंजने, दिनेश शर्मा उपस्थित होते.
शेतकऱ्यांचा देश असलेल्या भारताची अवस्था आज अतिशय बिकट झालेली आहे. काँग्रेस व भाजपसह सर्व राजकीय पक्ष आज केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांच्या राजकारणासाठी घोषणाबाजी करीत सुटले आहेत. केंद्र सरकारचे अन्न सुरक्षा विधेयक व इतर अनेक योजनांची घोषणासुद्धा निवडणुका बघता मतदारांना दाखविलेले आमिष असल्याची टीका जोशी यांनी केली. या योजनांमुळे सर्वसामान्य, आम आदमी किंवा शेतकऱ्यांचे भले होणार नाही. याउलट देश लुळापांगळा होण्यास मदत होणार आहे. केंद्र सरकारच्या अशा घातक योजनांमुळे या देशातील शेतकरी नागवला जाणार आहे. मतदारांना आमिष दाखविणाऱ्या या योजनांमुळे पंतप्रधान मनमोहन सिंग आम आदमीचे चुकीचे अर्थकारण मांडत आहेत. देशात खाद्यतेलाचे भाव चांगले असताना तेलाची आयात केली जात आहे. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत कमी होत चालली आहे. वीस वर्षांपूर्वी शेतकरी संघटनेच्या अधिवेशनातच आपण रुपयाची घसरण होत जाणार असल्याचे भाकीत केले होते. आज देशाची अर्थव्यवस्था त्याच दिशेने जात आहे. देशातील शेतकऱ्यांमध्ये हिंदू-मुस्लिम हा भेदभाव नव्हता. काँग्रेस व भाजपाने शेतकऱ्यांमध्ये विभागणी केली आहे. ही सर्व परिस्थिती बघता केवळ मतांसाठी राष्ट्रीय पक्षांमध्ये स्पर्धा सुरू असल्याचेही ते म्हणाले.
 शेतकरी संघटनेला आज ३३ वष्रे पूर्ण झाली असून या कालावधीत अनेक लोक संघटनेत आले आणि गेलेसुद्धा. आजही नव्या दमाचे तरुण शेतकरी संघटनेत उत्साहाने सहभागी होत आहेत ही आनंदाची बाब आहे. येणाऱ्या लोकसभेत चांगले लोकप्रतिनिधी निवडून पाठवा, असे आवाहन त्यांनी केले.  अ‍ॅड. चटप यांनी देशातील शेतकऱ्यांची व्यथा मांडली. आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. आज जलद गतीने शहरीकरण होत असून ग्रामीण भागातील लोक शहरात स्थलांतरित होत आहेत. शहरांत आणि ग्रामीण भागांत असंख्य प्रश्न आहेत. या प्रश्नांची सोडवणूक होणे आजची गरज आहे. शेतकऱ्यांचे जागरण होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे यासाठी निर्यात होणे आवश्यक आहे. देशाने आज शेतकऱ्यांना ताकद देण्याची खरी गरज असल्याचेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन प्रभाकर दिवे यांनी केले. या वेळी शेतकरी संघटना जिंदाबाद, स्वतंत्र भारत पक्ष जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्रासह पंजाब, हरयाणा, उत्तरप्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आदी १४ राज्यांतूनही शेतकरी प्रतिनिधी, श्रीधर बल्की, अशोक मुसळे, विजय निरंजने, विलास मोरे, रमेश नळे, रितेश सकलेनवार, मनोज पोतराजे, प्रशांत ताजणे, दिवाकर माणुसमारे, अरविंद गाढे, अनंत उमरीकर, रवी गोखरे, प्रा. सुरेश मात्रे उपस्थित होते.