मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात ६३ टक्क्यांवर झालेल्या मतदानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या असून, येथून काँग्रेस आघाडी वरचढ ठरण्याची स्पष्ट शक्यता निर्माण झाल्यानंतर काँग्रेसला नेमकी किती मतांची आघाडी मिळेल, याकडे सर्वाच्या नजरा खिळल्या आहेत. शहरातून काँग्रेस आघाडीला किती मते मिळतात आणि बाह्य मतदारसंघात काँग्रेस किती पिछाडीवर राहते, यावरच बऱ्याच अंशी धुळे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल अवलंबून असण्याचा आराखडा बांधला जात आहे.
गेल्यावेळी अमरिश पटेल या काँग्रेस उमेदवारास भाजपचे प्रताप सोनवणे यांनी २० हजारांच्या फरकाने पराभूत केले होते. त्यावेळी अल्पसंख्याकांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालेगाव मध्य मतदारसंघात पटेल यांना ४६ हजार मते पडली होती. सोनवणे यांना साधा चार हजारांचा टप्पादेखील येथून गाठता आला नव्हता. तर जनता दलाचे निहाल अहमद यांना शहरातून भरभरून मते पडली. तेव्हा अहमद यांना शहरातून मिळालेल्या ५८ हजार मतांचा पटेल यांना फटका बसला नसता तर निकालाचे चित्र वेगळे राहिले असते, असे निरीक्षण राजकीय क्षेत्रातील धुरिणांनी नोंदवले होते. या पाश्र्वभूमीवर, यंदाच्या निवडणुकीत मालेगाव मध्यमधील मतविभागणी टाळण्यासाठी प्रारंभापासून काँग्रेसने खबरदारी घेतली होती. परस्परांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल (तिसरा महाज), माजी आमदार शेख रशिद (काँग्रेस), निहाल अहमद (जनता दल) व माजी नगराध्यक्ष युनूस इसा (राष्ट्रवादी) अशा चारही मातब्बरांची मोट बांधण्यात यावेळी काँग्रेसला यश आले. त्यामुळे येथे काँग्रेसला मताधिक्य मिळेल, असे चित्र सुरुवातीपासून दिसून येत आहे.
मालेगाव मध्यमधील वाढीव मतदान पथ्यावर पडणार असल्याचे गृहीत धरून जास्तीत जास्त मतदान होण्याच्या दृष्टीने काँग्रेस प्रयत्नशील होती. त्या अनुषंगाने विचार करता येथून मतदानाचा टक्का वाढल्याने काँग्रेसच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. काँग्रेस आघाडीला येथे मोठी आशा असली, तरी दुसरीकडे भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना शहरातून फार अपेक्षा धरता येणार नाहीत.
महत्त्वाचे म्हणजे एकूण १९ पैकी आम आदमी पक्षाचे निहाल अहमद यांच्यासह अन्य अकरा अल्पसंख्याक उमेदवार रिंगणात असले, तरी यावेळी मतविभागणी होण्याची शक्यता फारच धूसर असल्याची खात्री दिली जात आहे. ‘मोदी फॅक्टर’मुळे अन्य ठिकाणी भाजपच्या छावणीत आनंदाचे भरते आल्याचे दिसून येत असताना, मालेगाव मध्य मतदारसंघात त्याची नेमकी उलटी प्रतिक्रिया उमटल्याचे दिसून येत आहे.
मालेगाव बाह्य मतदारसंघात अद्वय हिरे यांच्या जनराज्य आघाडीने पाठिंबा दिल्याने महायुतीची ताकद वाढली. त्यामुळे तेथून भाजपला आघाडी मिळेल अशी शक्यता आहे. शहरात काँग्रेसला मिळणारी आघाडी कमी करण्यात भाजपला बाह्य मतदारसंघात किती यश येते, यावर बरेच गणित अवलंबून राहील. तसेच धुळे मध्य, धुळे बाह्य, शिंदखेडा व सटाणा या अन्य चारही मतदारसंघांत काय स्थिती राहील, यावर काही गणिते अवलंबून असतील.