काँग्रेसचे जिल्ह्य़ातील ज्येष्ठ नेते विलास खरात यांनी अलीकडेच समाजवादी पार्टीत प्रवेश केला. त्यामुळे सर्वच पक्षांचे पुढारी व कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. खरात यांच्याकडे या पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली.
सन १९८५ मध्ये खरात हे अंबड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. तत्पूर्वी ते जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. दिवंगत बाळासाहेब पवार यांच्या पाठिंब्यावर खरात यांनी अंकुश टोपे यांच्याविरोधात राजकारण केले. जिल्हा बँक अस्तित्वात आल्यानंतर ते पहिले शासननियुक्त अध्यक्ष होते. नंतर त्यांनी निवडणूकही जिंकली. त्यांनी सहकारी सूतगिरणी स्थापन केली. जिल्हा दूध संघाचे अध्यक्षपद मिळविले. कुक्कुट पालन आणि गूळ युनिटही सहकाराच्या माध्यमातून स्थापन केले. राज्य सहकारी बँकेचे संचालकपद त्यांच्याकडे होते. त्यांनी शिक्षणसंस्थाही चालविली.
जालना जिल्हा परिषदेच्या पहिल्या निवडणुकीत टोपेंनी तेथे आपले वर्चस्व प्रस्थापित केले. जि. प.च्या दुसऱ्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेस जिल्हाध्यक्षपद टोपे यांच्याकडे होते. साहजिकच खरात समर्थकांना अपेक्षेप्रमाणे तिकिटे मिळाली नव्हती. त्यावेळी जी काही काँग्रेसची तिकिटे मिळाली होती, ती फाडून टाकून त्यांनी आपल्या ५ समर्थकांना जि. प. सदस्यपदी अपक्ष म्हणून निवडून आणले. पुढे हे ५ सदस्य जि. प.तील सत्ता स्थापनेत शिवसेना-भाजप युतीसोबत राहिले. जिल्हा बँकेतही पुढे त्यांचे समर्थक संचालक शिवसेना-भाजप युतीसोबत राहिले. या सर्व राजकारणात टोपे यांना विरोध करणे, हीच त्यांची भूमिका होती. १९९६ व १९९८मध्ये झालेल्या निवडणुकीत विलासरावांनी भाजपला सहकार्य केल्याचा आरोप झाला होता. राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार असताना जिल्हा बँकेच्या संदर्भातील गैरव्यवहाराच्या एका प्रकरणात त्या वेळच्या भाजपच्या सहकार राज्यमंत्र्यांनी खरात यांना दिलासा देणारा निकाल दिला. पुढे २००४च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु २००६च्या जूनमध्ये ते काँग्रेसमध्ये परतले.
वास्तविक, दोन वेळा विधानसभेवर निवडून आलेल्या खरात यांना १९९५मध्ये शिवसेनेच्या शिवाजीराव चोथेंकडून पराभव होईल, असे अजिबात वाटत नव्हते. परंतु अतिआत्मविश्वास व प्रतिस्पध्र्याच्या पाठीमागील ‘समर्थ’कांचा अंदाज घेण्यात चुकलेले खरात पुढे पक्ष संघटना, सत्तास्पर्धेत चाचपडतच राहिले. काँग्रेस, भाजप, पुन्हा काँग्रेस व आता समाजवादी पार्टी असा त्यांचा राजकीय प्रवास! राजकीय प्रवासातील तीन दशकांत एकेकाळी जिल्हा पातळीवरील पुढारी म्हणून त्यांची असणारी ओळख हळूहळू कमी होत गेली. नवी राजकीय गणिते मांडून त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यांना प्रदेश कार्याध्यक्षपद देण्यात आले आहे.