राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी २१ नोव्हेंबरला काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येणार आहेत. या सभेला जास्तीत जास्त गर्दी राहावी, यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी विदर्भातील पदाधिकाऱ्यांना आदेश दिलेले असल्याने गर्दी जमविण्याच्या नावाखाली पक्षाचे स्थानिक नेते कार्यकर्त्यांच्या बैठकी घेत आहेत. सभेच्या निमित्ताने कुठलीही गटबाजी चालणार नाही, असे आदेश देण्यात आले असले तरी या बैठकीच्या निमित्ताने पक्षातील गटबाजी चव्हाटय़ावर येण्याची शक्यता आहे. अलीकडेच प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंना याच कारणामुळे चंद्रपूरचा दौरा रद्द करावा लागला होता, हे विशेष.
कस्तुरचंद पार्कवर होणाऱ्या सोनिया गांधी यांच्या सभेला २ लाखापेक्षा जास्त लोक जमविण्याचे उद्दिष्ट पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्यामुळे पक्षातील सर्वच ज्येष्ठ नेते बैठकी घेत आहेत. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सभांना होणारी गर्दी बघता सोनिया गांधी यांची विदर्भातील लोकसभा निवडणुकीपूर्वी होणारी सभा ऐतिहासिक व्हावी, या दृष्टीने काँग्रेस पदाधिकारी कामाला लागले आहेत. प्रत्येकाला गर्दी जमविण्याचे ‘टार्गेट’ दिले जात आहे. गेल्या आठवडय़ात प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत सर्व नेते एकत्र आले असले तरी त्यातील काही वरिष्ठ नेत्यांनी मात्र स्वतची वेगळी चूल मांडण्यासाठी स्वतंत्र बैठका घेणे सुरू केले आहे. यामुळे सामान्य कार्यकत्यार्ंसमोर कोणत्या नेत्यांच्या बैठकीला जायचे, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
रविवारी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खासदार विलास मुत्तेमवार, आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी आणि अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी सभेच्या निमित्ताने आढावा घेतला. या नेत्यांच्या बैठकींमध्ये काही ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेतले जात नाही आणि त्यांना विचारले जात नसल्यामुळे त्यांनी दूर राहणे पंसत केले. सांगितले तेच करायचे, अशा मानसिकतेमध्ये ते घरी बसून आहेत. या सभेच्या निमित्ताने ‘आम्ही सर्व एक आहोत’, असे दाखविण्याचा प्रयत्न केला जात असला तरी त्यांच्यात समन्वय मात्र दिसून येत नाही. सभा चार दिवसांवर आलेली असली तरी काँग्रेसच्या तळागळातील कार्यकर्त्यांंमध्ये फारसा उत्साह दिसून येत नाही. एरवी पक्षाचा कुठलाही मोठा कार्यक्रम किंवा पक्षाचे वरिष्ठ नेते येणार असले की, काँग्रेसचे कार्यालय असलेल्या देवडिया भवनात दिवसभर वर्दळ असायची. मात्र, सभा चार दिवसांवर येऊनही उक्त नेत्यांच्याच कार्यालयात गर्दी दिसून येत आहे. सभेच्या निमित्ताने काही नेत्यांनी श्रेय घेण्याची तयारी सुरू झाली आहे त्यामुळे अनेकांनी स्वतच्या छायाचित्रांसह पोस्टर आणि होर्डिग तयार करण्याची तयारी सुरू केली आहे.
एकीकडे या कार्यक्रमाच्या निमित्ताने काँग्रेसमध्ये लगबग वाढली असली तरी दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीच हालचाल दिसत नाही. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. मात्र, त्यांच्या पक्षातील कुठल्याही नेत्याला गर्दीचे टार्गेट देण्यात आलेले नसल्याची माहिती मिळाली नाही. या पक्षाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम काँग्रेसचा असल्यामुळे आणि पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेतले जात नसल्यामुळे कार्यक्रमापासून स्वतला दूर ठेवले आहे.