11 August 2020

News Flash

उतावीळ कार्यकर्त्यांना काँग्रेस नेत्यांचा ठेंगा

नांदेड महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर स्थायी समिती सभापतिपद मिळवण्यासाठी ‘गुडघ्याला बाशिंग’ बांधून तयार असलेल्या दिलीप कंदकुर्ते, शैलजा स्वामी यांना काँग्रेसच्या नेत्यांनी ठेंगा दाखवला. उल्लेखनीय बाब

| December 27, 2012 12:23 pm

नांदेड महापालिका स्थायी समिती सभापतिपदासाठी
नांदेड महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर स्थायी समिती सभापतिपद मिळवण्यासाठी ‘गुडघ्याला बाशिंग’ बांधून तयार असलेल्या दिलीप कंदकुर्ते, शैलजा स्वामी यांना काँग्रेसच्या नेत्यांनी ठेंगा दाखवला. उल्लेखनीय बाब म्हणजे सर्वच पक्षांनी स्थायी समितीवर सिडकोला प्रतिनिधित्व देण्यास टाळले.
नांदेड महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव होते. ‘लाल दिव्या’ची गाडी मिळावी यासाठी दिलीप कंदकुर्ते यांच्यासह अनेकजण इच्छुक होते. पण ऐनवेळी ज्येष्ठ नगरसेवक अब्दुल सत्तार यांना संधी मिळाली. महापौरपद गेल्यानंतर या पदासाठी इच्छुक असलेल्या काहींनी स्थायी समितीच्या सभापतिपदावर डोळा ठेवला. सलग दोन वर्षे स्थायी समितीचे सभापतिपद उपभोगणाऱ्या दिलीप कंदकुर्ते यांना हे पद मिळेल, असे वाटत होते. पण काँग्रेस श्रेष्ठींनी त्यांना डावलले. सभापतिपद तर सोडाच, पण त्यांनी स्थायी समितीवर घेण्याचेही नेत्यांनी टाळले. एक वर्ष सभापतिपद भोगणारे किशोर स्वामी यंदा आपल्या सौभाग्यवतीसाठी प्रयत्नशील होते, पण शिवसेनेशी त्यांचे सख्य लक्षात घेता त्यांनाही संधी मिळाली नाही.
काँग्रेसने महापालिकेत पहिल्यांदाच जाणाऱ्या मोहिनी कनकदंडे, कमलाबाई मुदिराज यांना संधी देत फारूकअली खान, सरजितसिंग गिल, तहसीन बेगम, अ. लतीफ अ. मजीद, सतीश राखेवार व गणपत धबाले यांना संधी दिली. राष्ट्रवादीने पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक गफार महमूद खान यांच्यासह नव्यानेच महापालिकेत दाखल झालेल्या श्रद्धा जाधव यांना स्थायी समितीवर पाठविले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उरात धडकी भरवणाऱ्या एमआयएमने ललिता बेगम बुऱ्हाणखान, चांदपाशा कुरेशी व अंजली गायकवाड तर शिवसेनेने शांता मुंडे, अशोक उमरेकर व गुरुमितसिंग नवाब यांना स्थायी समितीवर काम करण्याची संधी दिली. माजी महापौर सुधाकर पांढरे हे स्थायी समितीचे सभापती होतील, असा अनेकांचा अंदाज होता, पण स्वत: पांढरे व त्यांची कन्या या दोघांनाही काँग्रेसने पाठविले नाही. निवड झालेल्या १६ सदस्यांपैकी एकही सदस्य हडको-सिडको परिसरातला नाही.     

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2012 12:23 pm

Web Title: congress leaders neglecting the others members
टॅग Congress,Corporation
Next Stories
1 ‘मकृवि’ ठरतेय विदेशी विद्यार्थ्यांचे आकर्षण!
2 रोहयोचे अवास्तव निधी प्रकरण
3 ‘मराठवाडय़ाचा युवा वक्ता’ स्पर्धेचे आयोजन
Just Now!
X