लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी, यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सुरू झालेले घमासान मुद्यावरून गुद्यावर आल्याचे चित्र शनिवारी पाहावयास मिळाले. पक्षनिरीक्षकांच्या साक्षीने भिडलेल्या कार्यकर्त्यांनी हाणामारी, खुच्र्याची फेकाफेक केली. यात एकाचे डोके फुटले. सलग दोन दिवस काँग्रेसच्या बैठकीत ताणाताणी झाल्याने उमेदवार निवडीचे नाटय़ आता वेगळ्याच वळणावर भरकटले असल्याची चर्चा पक्षाच्या कार्यकर्त्यांत उघडपणे होत आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांचे डोके फुटल्याप्रकरणी सिटी चौक पोलिसात नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
काँग्रेसतर्फे उमेदवार निवडीच्या राहुल फॉम्र्युल्यातून औरंगाबादचे नाव गळाल्यानंतर ‘मीच योग्य उमेदवार’ हे सांगण्यासाठी पक्षाच्या बैठकीत इच्छुक उमेदवारांच्या समर्थकांनी चांगलीच उचल खाल्ली आहे. माजी खासदार उत्तमसिंह पवार व नितीन पाटील या दोघांची नावे पक्षाचे इच्छुक म्हणून पुढे आहेत. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी ‘आगे बढो’ च्या घोषणा देत पक्षाच्या निवडणूक निरीक्षकांसमोर शुक्रवारीही धुडगूस घातला. परंतु निरीक्षकांनी मात्र त्या कार्यकर्त्यांच्या भावना होत्या, असे म्हणत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
परंतु शनिवारीही बैठकीत कार्यकर्त्यांचा गोंधळ सुरू राहिला. प्रकरण मुद्यावरून गुद्यावर आले. निरीक्षकांसमोरच कार्यकर्त्यांनी खुच्र्याची फेकाफेक सुरू केली. पवार व पाटील समर्थकांचे घोषणायुद्ध झाले. याच वेळी एका कार्यकर्त्यांच्या मारहाणीत रहिम पटेल (वय ३१, हर्सूल, औरंगाबाद) या कार्यकर्त्यांचे डोके फुटले. या वेळी पोलिसांनी धाव घेत त्याला दवाखान्यात नेले. तोपर्यंत १०-१५ मिनिटे हा गोंधळ सुरू होता. व्यासपीठावर निरीक्षकांसमवेत एक इच्छुक नितीन पाटील हेही उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार काही कार्यकर्त्यांनी पक्षातील गद्दारांना उमेदवारी देऊ नये, अशा आशयाची पत्रके घोषणाबाजीत वाटणे सुरू केले. पाटील यांनी गेल्या काही दिवसांत केलेल्या वक्तव्यांची पाश्र्वभूमी या पत्रकांना होती. या वक्तव्यांविषयी वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांच्या कात्रणांसह काही कार्यकर्त्यांनी पत्रके वाटणे सुरू केले. मात्र, त्याला जोरदार आक्षेप घेत दुसऱ्या गटाच्या कार्यकर्त्यांनी थेट गुद्दागुद्दी सुरू केली. खुच्र्याची फेकाफेक व हाणामारी यामुळे प्रकरण चिघळले.
दरम्यान, आजचा गोंधळ व कार्यकर्त्यांचे डोके फोडण्याचा प्रकार अयोग्य असून, पक्षाच्या शिस्तीत बसणारा नाही. त्यामुळे या प्रकाराचा आपण निषेधच करतो, अशी प्रतिक्रिया माजी खासदार उत्तमसिंह पवार यांनी या संदर्भात बोलताना व्यक्त केली. स्वत: पवार हेही उमेदवारीच्या शर्यतीत आहेत.