News Flash

काँग्रेसच्या मंत्र्यांचे पुन्हा एकला चलो रे…

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या संयुक्त प्रचाराचा शुभारंभ दोन्ही काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झाला. नंतर काँग्रेसच्या स्वतंत्र प्रचाराचा आढावा घेण्यासाठी दोन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकही झाली.

| December 3, 2013 01:58 am

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या संयुक्त प्रचाराचा शुभारंभ दोन्ही काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झाला. नंतर काँग्रेसच्या स्वतंत्र प्रचाराचा आढावा घेण्यासाठी दोन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकही झाली. त्यानंतर मात्र कृषिमंत्री राधाकृष्ण विखे त्यांच्या कार्यक्रमासाठी लोणीला निघून गेले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात नगरमध्येच आपल्या गटाच्या उमेदवारांच्या प्रचारात रममाण झाले. काल पुन्हा रंगलेल्या या काँग्रेसअंतर्गत गटबाजीच्या ‘येरे माझ्या मागल्या..’च्या खेळाची शहरात चर्चा होत आहे.
जिल्हय़ात काँग्रेसअंतर्गत सर्वदूर पसरलेले थोरात-विखे या दोन गटांतील वाद ग्रामीण भागास नवे नाहीत. काँग्रेसमधील कोणत्याही कार्यक्रमात वादाची सीमारेषा अधोरेखित झालेली असते. ग्रामीण भागात मर्यादित असलेली ही सीमारेखा नगरमध्येही स्पष्ट झाली आहे. शहरात महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले तसा प्रचार आता शिगेला पोहोचला असला, तरी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा एक दिवसाचा अपवाद वगळता काँग्रेसच्या दोन्ही मंत्र्यांनी एकत्र कार्यक्रम घेणे टाळलेच आहे. शहरातील पदाधिका-यांनी प्रत्येक कार्यक्रम दोन्ही मंत्र्यांच्या तारखा घेऊन ठरवल्या तरी विखे आहेत तर थोरात अनुपस्थित किंवा थोरात आहेत तर विखे अनुपस्थित असेच प्रसंग वारंवार घडले. जणू ही गटबाजी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अंगवळणीच पडली.
काल आघाडीच्या संयुक्त प्रचाराचा नारळ फुटला. त्याला राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर थोरात व विखे दोघेही एकत्रित उपस्थित राहिले. नंतर थोरात व विखे यांनी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराचा आढावा घेण्यासाठी हॉटेल आयरिशमध्ये प्रमुख पदाधिका-यांची एकत्रित बैठकही घेतली. त्यास दोन्ही गटांचे पदाधिकारीही उपस्थित होते. दोन्ही नेते एकत्र येण्यावर विश्वास नसलेले काँग्रेसजन या घटनेने सुखावले. बैठक आटोपून सर्व जण बाहेर आले, मात्र विखे आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार निघून गेले. थोरात यांचा औरंगाबादचा कार्यक्रम काही कारणाने रद्द झाल्याने त्यांनी नगरमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला. लगेच थोरात गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या शहरातील प्रचाराचे नियोजन केले. मात्र हॉटेलच्या आवारात उपस्थित असूनही विखे गटाच्या कार्यकर्त्यांना त्याची कल्पनाच दिली नाही की, त्यासाठी निमंत्रितही केले नाही.
थोरात यांनी काल काँग्रेसचे उमेदवार संजय मोरे, डॉ. अविनाश मोरे, धनंजय जाधव, सुवार्ता वाघमारे यांच्या प्रभागात जाऊन प्रचारफेऱ्या काढल्या, प्रमुख नागरिकांच्या उपस्थितीत बैठका घेतल्या, प्रचार कार्यालयाचे उद्घाटनही केले. यापैकी काही ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार व पदाधिकारीही उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत थोरात मतदारांच्या गाठीभेटी घेत होते. मात्र त्यास विखे गटाचा कोणीही पदाधिकारी उपस्थित नव्हता. थोरात यांनी काल ज्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वेळ दिला, ते सर्व त्यांच्याच गटाचे होते, याकडे विखे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने आवर्जून लक्ष वेधले. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना काही वेळासाठी दिलासा दिल्यानंतर गटबाजीचा ‘येरे माझ्या मागल्या’चा खेळ यापुढेही सुरूच राहील, याची खात्री पदाधिका-यांना पटली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 1:58 am

Web Title: congress minister again ekla chalo re
Next Stories
1 पाण्याचे भांडण आता गावपातळीवर
2 आमदार-खासदारच आमनेसामने
3 ‘अगस्तीने आधी अर्बनचे थकीत कर्ज फेडावे’
Just Now!
X