सत्ताधारी भाजप केंद्रातील सत्तेची वर्षपूर्ती साजरी करत असताना दुसरीकडे भाजपचा प्रतीकात्मक निषेध नोंदविण्यासाठी काँग्रेसने आयोजिलेल्या ‘अच्छे दिन’च्या पहिल्या पुण्यतिथी आंदोलनाला पक्षाला कार्यकर्ते व पदाधिकारी मिळणेही अवघड झाल्याचे पाहावयास मिळाले. बोटावर मोजता येतील इतके पदाधिकारी आणि काही कार्यकर्त्यांनी भाजप सरकारविरोधी घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या आंदोलनाकडे काँग्रेसच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा भंग केल्याच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या वर्षपूर्तीला प्रदेश काँग्रेसने हा दिवस अच्छे दिनची पहिली पुण्यतिथी म्हणून साजरी करून प्रतीकात्मक निषेध नोंदविण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने शहर व जिल्हा काँग्रेसने महात्मा गांधी रस्त्यावरील पक्ष कार्यालयाबाहेर भाजप सरकारच्या निषेधार्थ फलक उभारला. तसेच केंद्र सरकार विरोधात मोर्चाचे आयोजन केले. सकाळी अकरा वाजता हे आंदोलन होणार असल्याने पोलीस यंत्रणा आधीपासून परिसरात तैनात झाली. भाजपच्या निवडणुकीतील घोषणांच्या फलकाला चपलांचा हार घालुन अच्छे दिनला प्रतीकात्मक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर शहराध्यक्ष शरद आहेर, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यात सहभागी झालेले पदाधिकारी व कार्यकर्ते असे मिळून ५० जणही नव्हते. स्थानिक पातळीवर काँग्रेस पक्षात अनेक गटतट आहेत. यामुळे अन्य गटांचे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांनी पक्षाच्या आंदोलनाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. यामुळे मोर्चाला वेगळेच स्वरूप प्राप्त झाले. मोदी सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत किंवा ती पूर्ण करण्याच्या दिशेने पावले टाकली नाहीत. मोदी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची यादी असणारे स्मरणपत्र निवेदनाच्या स्वरूपात जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. मोदी सरकारने आपल्या घोषणांची पूर्तता न केल्यास पुढील वर्षी पुन्हा अच्छे दिनची पुण्यतिथी साजरी करण्याचा इशारा आहेर यांनी दिला.