भूसंपादन विधेयक शेतक ऱ्यांच्या आणि देशाच्या विकासाच्या दृष्टीने फायदेशीर असताना काँग्रेस या विधेयकावरून देशाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी केला. निवडणुकीच्या काळात काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधीचे फारसे महत्त्व नव्हते. आता फारसे उरले आहे, असे वाटत नाही. काँग्रेसकडे सध्या कुठलाच विषय नसल्यामुळे त्यांना शांत बसू द्या, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
भाजयुमोच्या बैठकीच्या निमित्ताने नागपुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. भूसंपादन विधेयक लोकसभेत पारीत झाल्यानंतर त्याला प्रारंभी विरोध केल्यानंतर अनेक बदल करण्यात आले त्यामुळे शेतक ऱ्यांच्या विरोधात विधेयक राहिले नाही. काँग्रेस ६० वर्षांत करू शकले नाही ते काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ महिन्याच्या कार्यकाळात केले आहे. महागाई कमी करण्यात आली आहे. गोरगरिबांसाठी अनेक योजना जाहीर करून त्याचा लाभ त्यांना मिळतो आहे. भ्रष्टाचार कमी झाला आहे. नव्याने बदल करण्यात आलेल्या विधेयकात शेतक ऱ्यांच्या जमिनीचे भाव वाढणार आहेत. उद्योग येतील त्यामुळे रोजगार वाढतील. गावातील युवकांना शैक्षणिक सुविधा निर्माण करता येतील. काँग्रेससह इतर काही पक्ष या विधेयकावरून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला.
आम आदमी पक्षात अंतर्गत वाद वाढले असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. जनतेला अनेक आश्वासने दिली होती. मात्र, ती खोटी ठरली असून त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. भाजयुमोने काँग्रेस आघाडी सरकार असताना अनेक आंदोलने केली असली तरी आता सरकारमध्ये जनहिताच्या दृष्टीने विचार करणार आहे. केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्या समाजातील शेवटच्या माणसांपर्यंत कशा पोहोचतील, या दृष्टीने काम करणार आहे. भाजयुमोचे कार्यकर्ते आपमध्ये गेले असल्याची केवळ चर्चा असून मात्र कुठलेच कार्यकर्ते त्यांच्या पक्षात गेले नाही. उलट, गेल्या दोन ते महिन्यात आपमध्ये असलेले अनेक युवा कार्यकर्ते भाजयुमोशी जुळले आहेत. आपमध्ये पदाधिकाऱ्यांचे वाद असल्यामुळे ते युवा कार्यकर्त्यांसमोर काय आदर्श ठेवणार आहे, अशी टीका त्यांनी केली.

‘सिलिंडरच्या सबसिडीचा लाभ
गरिबांना देण्यासाठी जनजागृती’
केंद्र सरकारने सिलिंडरमध्ये सबसिडी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा लाभ श्रीमंत घेत असल्याचे दिसते. तो लाभ गोरगरिबांना मिळावा, या उद्देशाने देशभर मोहीम राबविण्यात येणार असून त्या दृष्टीने जिल्हा पातळीवर कार्यक्रम ठरविण्यात आला आहे. सरकारच्या विविध योजनांसोबत कार्यकर्त्यांंनी विविध वस्त्यांमध्ये जाऊन सबसिडीच्या दृष्टीने जनजागृती करावी, असे आवाहन भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी केले.
भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत झालेल्या युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना ते म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर देशभरात मोठय़ा प्रमाणात युवक भाजपमध्ये येत असल्यामुळे पक्षाची ताकद वाढली आहे. केंद्र व राज्य सरकाच्या विविध योजना समाजातील गोरगरिबांपर्यंत पोहोचल्या नाहीत. विशेषत सिलिंडरमध्ये सबसिडीचा लाभ श्रीमंत घेत असल्याचे दिसते. गोरगरिबांना त्याला लाभ मिळावा, या दृष्टीने देशभर जिल्हा पातळीवर समिती स्थापन करून तसा कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्य़ात तो राबविला गेला पाहिजे, अशी सूचना केली. भाजयुमोने वर्षभरात अनेक उपक्रम हाती घेतले असून त्याचा माहिती टप्याटप्याने देण्यात येणार आहे. देशातील प्रत्येक नागरिक भाजपशी जोडला गेला पाहिजे म्हणून सदस्य मोहिमेकडे लक्ष द्यावे. नागपूर विभागात ६५ हजार सदस्य केले हे अभिनंदनीय असले तरी हा आकडा एक लाखापर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. बैठकीला महापौर प्रवीण दटके, श्रीकांत देशपांडे, अविनाश खडतकर, शहर अध्यक्ष बंटी कुकडे, शिवानी दाणी आदी भाजयुमोचे कार्यकर्ते उपस्थित होते.  

वर्ल्डकपमध्ये बांगलादेश आणि भारत सामन्यानंतर बांगलादेशने केलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. मुळात जे आरोप केले ते आयसीसीच्या बैठकीत मांडता आले असते. मात्र, त्यांनी ते केले नाही. पराभव पचवता आला पाहिजे. मात्र, ते त्यांना शक्य झाले नाही. भारताने वर्ल्ड कपमध्ये अतिशय चांगली कामगिरी केली. प्रारंभीचे सातही सामने जिंकणे ही भारतासाठी मोठी उपलब्धी होती. उपांत्य फेरीत भारताचा पराभव झाल्यानंतर देशभरात लोकांनी भारतीय चमूच्या कामगिरीचे कौतुक केले असल्याचे ठाकूर म्हणाले.